
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाट रोखण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत देशभरात 50 इनोव्हेटिव्ह मॉडय़ूलर रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे, जालना आणि अमरावतीमध्ये 100 बेड्सची तीन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोनाविरोधातील लढाईत आरोग्याच्या मूलभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर देण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून केले जात आहे. सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा भार कमी व्हावा या उद्देशाने विद्यमान रुग्णालयाच्या इमारतीशेजारीच इनोव्हेटिव्ह मॉडय़ूलर रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयांना जवळपास 3 कोटींच्या आसपास खर्च होण्याचा अंदाज आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पुणे, जालना आणि अमरावती तसेच बिलासपूर, मोहालीमध्ये 100 बेड्स मॉडय़ूलर रुग्णालय बनेल. रायपूरमध्ये 20 बेड्सचे तर बंगळुरूमध्ये 20, 50 आणि 100 बेड्सचे एक-एक रुग्णालय तयार करण्यात येणार आहेत. ही रुग्णालये कोरोनाविरुद्धच्या लढाईत विशेषतः ग्रामीण भागात आणि छोटय़ा शहरांमध्ये आरोग्याच्या प्रमुख पायाभूत सुविधांमधील दरी कमी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- एका जागेवरून दुसऱया जागी हलवता येतील अशा या निगेटिव्ह प्रेशर पोर्टेबल रुग्णालयांची टिकाऊ क्षमता साधारण 25 वर्षे आहे आणि भविष्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रतिसादासाठी या रुग्णालयांना एक आठवडय़ापेक्षा कमी कालावधीतदेखील हलवले जाऊ शकते.
- मद्रास आयआयटी यांनी मॉडय़ूलस हाऊसिंग या स्टार्ट-अप उपक्रमाद्वारे मेडिकॅब रुग्णालये विकसित केली आहेत.
- या उपक्रमाद्वारे 3-आठवडय़ांच्या कालावधीत 100 खाटा असलेली रुग्णालयाची विस्तारित सुविधा उभारण्यात येते.
- मेडिकॅब रुग्णालये अतिदक्षता विभाग (आयसीयू) च्या समर्पित क्षेत्रासह तयार केली गेली आहेत. ज्यात जीवरक्षक उपकरणे आणि वैद्यकीय उपकरणे समाविष्ट आहेत.






















































