कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच, रुग्णसंख्येच्या आधारेच शाळा उघडा; ICMR च्या शास्त्रज्ञांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिली गेली, दुसरी ओसरली आता कोरोनाची तिसरी लाट येणार अशा शक्यतेने देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शास्त्रज्ञांचे मात्र वेगळेच मत आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्यता कमीच असल्याचे राष्ट्रीय औषध संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मात्र तसे झाले तरी शाळा उघडण्याची घाई करू नका, रुग्णसंख्येच्या आधारावरच शाळा उघडायच्या की नाहीत याचा निर्णय घ्या असा सल्ला ‘आयसीएमआर’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे.

देशात अजून लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. लहान मुलांमध्ये कोरोनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

‘फ्लू’सारखाच संपेल कोरोना विषाणू

कोरोनाचा विषाणू हा कालांतराने सौम्य होत जाईल आणि भविष्यात इन्फ्लुएन्झा विषाणूसारखाच निष्प्रभ होईल असे डॉ. गंगाखेडकर या मुलाखतीत सांगतात. लसीकरणामुळे येणाऱया काळात लक्षणरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण आढळू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात कोरोनाचा संसर्ग होतच राहील. कारण लसीमुळे आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही परंतु संसर्ग मात्र होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रभाव संपत नाही किंवा कोरोनाचा नवा विषाणू येत नाही तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही असेही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले आहे.

लस न घेतलेल्या नागरिकांना मृत्यूचा धोका दहा पट जास्त

प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनत नाही. यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद असू शकतात परंतु बहुतांश नागरिकांसाठी लसीकरण हे सुरक्षा कवच ठरले आहे. दुसरीकडे लस न घेतलेल्या नागरिकांना मृत्यूचा धोका दहा पट जास्त असतो असे संशोधनामध्ये उघड झाले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या मृत्यूची शक्यता 11 पटीने कमी झाल्याचाही शास्त्र्ाज्ञांचा दावा आहे. यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने हे संशोधन केले आहे. अमेरिकेच्या विविध भागांमध्ये हे संशोधन करण्यात आले.