
>> संतोष आंधळे
कोरोनाबाधित अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्ण बरे करण्यासाठी विविध उपचार पद्धतीची मदत घेतली जात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते गंभीर रुग्णांना बरे करण्यात जितकी औषधाची मदत होते तेवढीच मदत चांगल्या फिजिओथेरपीच्या उपचारांची होत आहे, त्यामुळे कोरोनाच्या उपचारात फिजिओथेरपी वरदान ठरत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे फिजिओथेरपिस्ट, अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून या विभागात रोज हजेरी लावून पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई ) किट-स्वयं संरक्षक पोशाख घालून रुग्णांना व्यवस्थित उपचार देत आहेत. सर्वसामान्यांना हे माहीत नसले तरी जगभरात कोविड-19 चे रुग्ण बरे करण्यात फिजिओथेरपीचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे.
पुणे येथील केईएम रुग्णालयातील श्वसनविकारतज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, ‘कोविड-19 बाधित रुग्ण बरा करण्याकरिता विविध विषयांतील तज्ञ डॉक्टरांची टीम एकत्र येऊन रुग्णाला उपचार देत असते. प्रत्येक जण आपापल्या विषयातील तज्ञ आहे. तो त्याप्रमाणे उपचार देत असतो. आमच्या रुग्णालयातील सर्व रुग्णांना आम्ही फिजिओथेरपीचे उपचार देत असतो. त्याचप्रमाणे जे रुग्ण जास्त दिवस रुग्णालयात ऑक्सिजनवर असतात त्यांच्या शरीराची हालचाल फार कमी प्रमाणात होत असते.
रुग्ण झोपून असल्यावर त्याच्या शरीरातील प्राणवायूची पातळी आणि रुग्ण चालू-फिरू लागल्यावर त्याच्या शरीरातील प्राणवायूच्या पातळीत फरक असतो. फिजिओथेरपीच्या योग्य उपचार पद्धतीने ही प्राणवायूची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तर काहींना लंग्स फायब्रोसिस (फुप्फुसाचे विकार) असतात अशा रुग्णांमध्ये फिजिओथेरपी केल्यानंतरचा फायदा दिसून आला आहे.’
याप्रकरणी डॉ. सुदीप काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) परिषद, सांगतात की, ‘कोरोना मुख्यत्वे श्वसन प्रणालीवर आघात करत असल्याने अशा रुग्णांमध्ये फिजिओथेरपीचे महत्त्व वाढत आहे. ए.आर.डी एस (श्वसन संस्थेशी निगडित आजार) न्यूमोनिया या आजारामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. असे रुग्ण काही वेळा अतिदक्षता विभागात दाखल होतात. या अशा रुग्णांमध्ये आढळणाऱया गंभीर लक्षणांमध्ये फिजिओथेरपीची मदत होत असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध होत आहे. रुग्णाची श्वसननलिका खुली ठेवणे, त्यातील बेडके स्राव बाहेर काढणे व रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे हे फिजिओथेरपिस्टच्या कामाचे मुख्य स्वरूप आहे.’
n फिजिओथेरपीचे उपचार प्रशिक्षित नोंदणीकृत फिजिओथेरपिस्टकडून घेणे महत्त्वाचे आहे, नाही तर आजकाल कुणीही फिजिओथेरपीच्या नावाखाली चुकीच्या उपचार पद्धतीचे व्हिडीओ तयार करत असून यामुळे रुग्णाला धोका होऊ शकतो. त्या स्वरपुपाचे काही व्हिडीओ व्हायरलही झाले आहेत. मात्र महाराष्ट्र व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) परिषदेने याची गंभीर दखल घेऊन अशा पद्धतीने चुकीचे व्हिडीओ पसरवणाऱयाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला आहे.





























































