पालिकेचे लसीकरण वेगात; एक लाखावर व्हॅक्सिनेशन पूर्ण, एकालाही साईड इफेक्ट नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 7 हजार 725 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पहिल्या टप्यातील आरोग्य कर्मचारी आणि दुसऱया टप्प्यातील फ्रंटलाईन वर्करला लस देण्यात येत आहे.

लाखो जणांना लसीकरण झाल्यानंतर आतापर्यंत एकालाही साईड इफेक्ट झालेला नाही. लसीकरण वेगाने सुरू असून पालिकेकडे 5 लाख 32 हजार 100 डोस उपलब्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या लसीकरणात  12 फेब्रुवारीपर्यंत  87,416 आरोग्य कर्मचारी व 20,309 आघाडीवर काम करणाऱया कर्मचा-यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांच्या संख्या व सुलभतेसाठी 14 अतिरिक्त लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली व या केंद्राची क्षमता दरदिवशी 12,500 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याइतपत वाढवण्यात आली आहेत.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात 9 अद्ययावत लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली. 16 जानेवारी  रोजी पहिल्या दिवशी 1,957 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. 5 फेब्रुवारी रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा कोविड आघाडीवर काम करण्याऱया इतर कर्मचाऱयांसाठी (FLW) कार्यान्वित करण्यात आला. तर 6 फेब्रुवारी रोजी पोलीस दलासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.

दरम्यान, पालिकेने पहिल्या व दुसऱया  टप्प्यासाठी 23 लसीकरण केंद्रांमध्ये 125 बूथ कार्यान्वीत केलेली आहेत. आवश्यकतेनुसार त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्यांत येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.