लसीकरणासाठी तीन कॉल, तीन एसएमएस; संपर्कानंतरही व्यक्ती आली नाही तर लसीकरणातून बाद

कोरोना लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असले तरी हे लसीकरण संपूर्ण स्वेच्छिक आहे. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तीला तीन वेळा संपर्क केला जाणार आहे. तीन वेळा फोनवरून तर तीन वेळा एसएमएस करून व्यक्तीला लसीकरणाची आठवण करून दिली जाणार आहे.

मात्र, त्यानंतरही एखादी व्यक्ती लसीकरणासाठी आली नाही तर ती व्यक्ती लस घ्यायला उत्सुक नाही, असे समजून त्याचे नाव लसीकरणातून बाद करण्यात येईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

केईएममध्ये तीन वॉर्डमधील रहिवाशांना लस

केईएम रुग्णालयात आज 243 सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. यात एफ/दक्षिणमध्ये येणाऱया परळ, लालबाग, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा, नायगाव तर जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागात येणाऱया वरळी, प्रभादेवी, लोअर परळ व दादर, माहीम आणि धारावीतील आरोग्य कर्मचाऱयांचा समावेश आहे. या तीन विभागांतील पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील लसीकरण केईएममध्येच होणार आहे.

केईएममध्ये सध्या 5 कक्ष सुरू असून काही दिवसांत 10 कक्ष सुरू होतील. त्यामुळे दरदिवशी हजार ते 1200 रुग्णांना लस देणे शक्य होणार आहे. केईएम रुग्णालयात अकॅडमिक डीन डॉ. मिलिंद नाडकर यांच्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आरोग्य कर्मचारी विमल खरात आणि शेखर जाधव यांना लस देण्यात आली.

आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कर्मचाऱयांची नोंदणी या ऍपवर झाली आहे. पैकी पहिल्या टप्प्यात 1 लाख 30 हजार हेल्थकेअर वर्कर्संना डोस देण्यात येणार आहे. 9 केंद्रांवर 40 बुथवर लसीकरण सुरू आहे. मात्र, तीन वेळा फोन आणि तीन वेळा एसएमएस करून संपर्क करूनही लसीकरणासाठी व्यक्ती आली नाही तर तिला पालिकेकडून पुन्हा मोफत लस दिली जाणार नाही. त्या संधीला ती व्यक्ती कायमस्वरूपी मुकेल, असेही डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.

या व्यक्तींनी लस घेऊ नये!

कोरोना पॉझिटिव्ह आणि त्याची लक्षणे असलेल्या व्यक्तीने लस घेऊ नये. विशिष्ट अन्न आणि औषधी गोळ्या घेतल्यानंतर ऍलर्जी होत असेल तर अशा व्यक्तींनी ही लस घेऊ नये. थोडक्यात फुड आणि ड्रग ऍलर्जी असलेल्यांनी घेऊ नये, ते त्यांच्या जिवावर बेतू शकते, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या