
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस दीडशे रुपयांना देणे परवडणारे नाही, असे भारत बायोटेकने मंगळवारी जाहीर केल्यानंतर बुधवारी पुन्हा लसीकरण धोरणावरून नवा गोंधळ पुढे आला आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडय़ांपर्यंत वाढविण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती, असा दावा ‘एनटीएजीआय’च्या तज्ञ गटातील दोन शास्त्रज्ञांनी केला आहे. तर हा निर्णय वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य आहे, असे या गटाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. या दावे-प्रतिदावे यामुळे संभ्रम कायम आहे.
देशात लसीकरण सुरू झाले तेव्हा कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींसाठी दोन डोसमधील अंतर 28 दिवसांचे ठेवण्यात आले. त्यानंतर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवडय़ांपर्यंत वाढविले. त्यानंतर 16 मे रोजी हे अंतर 12 ते 16 आठवडे करण्यात आले. आता महिन्यानंतर दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडय़ांपर्यंत वाढविण्यावरून वाद पुढे आला आहे. 12 ते 16 आठवडय़ापर्यंत वाढविण्याची शिफारस केली नव्हती, असे नॅशनल टेक्निकल अॅडव्हटायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या तज्ञ गटातील सदस्य एम. डी. गुप्ते आणि मॅथ्यू वर्गेसी यांनी म्हटले आहे.
तज्ञांची बाजू
‘एनटीएजीआय’च्या वैज्ञानिकांनी 8 ते 12 आठवडय़ांपर्यंत दोन डोसमधील अंतर वाढवण्यावर सहमती दर्शविली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही हे सांगण्यात आले होते. मात्र, 12 ते 16 आठवडय़ांपर्यंत अंतर वाढविण्याचे निर्णय सरकारचा आहे. दोन डोसमधील अंतर 12 आठवडय़ांपेक्षा जास्त झाल्यास काय संभाव्य परिणाम होऊ शकतात याचा डाटा ‘एनटीएजीआय’कडे नाही, असे एम. डी. गुप्ते म्हणाले. दुसरे सदस्य मॅथ्यू वर्गेसी यांनीही गुप्ते यांच्या दाव्याला दुजोरा दिला.
सरकारची बाजू
‘एनटीएजीआय’चे अध्यक्ष एन. के. अरोरा यांनी खुलासा करताना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्यामागे वैज्ञानिक आधार असल्याचे म्हटले आहे. अंतर वाढवल्यानंतर लसीची परिणामकता वाढते हे ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या डाटावरून स्पष्ट झाले आहे. असा दावा अरोरा यांनी केला. दरम्यान, अरोरा यांचा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विट केला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनीही तज्ञांच्या शिफारसीनुसारच हे अंतर वाढविण्याचे म्हटले आहे. मतभेदांचे त्यांनी खंडन केले आहे.





























































