जानेवारीत लस, ऑक्टोबरमध्ये गाडे रुळावर! ‘सिरम’ला प्रतीक्षा फक्त केंद्र सरकारच्या मंजुरीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोना लसीकरणासाठी आता फक्त केंद्राच्या औषध मानक नियंत्रण संघटनेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. सिरम इन्स्टिटय़ूटला लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी हवी आहे. ही मंजुरी याच महिन्यात मिळाल्यास लसीकरण मोहीम पुढील महिन्यात सुरू होईल, असा विश्वास कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.

पुनावाला हे ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलत होते. सिरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बरोबरीने कोरोना लस विकसित करीत आहे. या लसीला औषध नियामक संस्थेची मंजुरी मिळाल्यास देशात लसीकरणाला पुढील महिन्यात नक्कीच सुरुवात होईल. ऑक्टोबर 2021 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध केली जाईल. त्यानंतर जनजीवन पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा पुनावाला यांनी व्यक्त केली. एकदा देशातील 20 टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचली की, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, असेही ते म्हणाले. तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीवरून सिरम इन्स्टिटय़ूटने देशातील लसीच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा अंतरिम सुरक्षा अहवाल सादर केला आहे. तसेच हिंदुस्थान, ब्रिटनसह अन्य देशांत केलेल्या चाचण्यांतील निष्कर्षही मांडले आहेत.

सरकार जुलैपर्यंत 40 कोटी डोस खरेदी करणार

सिरम इन्स्टिटय़ूट सरकारबरोबरच खासगी मार्पेटसाठी लस बनवत आहे. केंद्र सरकार जुलै 2021 पर्यंत कोरोना लसीचे 30 ते 40 कोटी डोस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. जवळपास 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस टोचण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची योजना आहे, असे पुनावाला यांनी सांगितले. सुरुवातीला प्रत्येक केंद्रावर दररोज 100 लोकांना लस देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.