कोरोनावरील औषधांमुळे होऊ शकतो गुप्तरोग, WHOने दिला धोक्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नावाच्या विषाणूने सध्या सगळ्या जगाला वेठीला धरलं आहे. एकिकडे रुग्णांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे लस शोधण्याचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखणाऱ्या एका प्रतिजैविक औषधाविषयीचा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनावर उपचारांसाठी सध्या काही प्रतिजैविकांचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे. पण या प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे सुपर गोनोरिया नावाचा एक गुप्तरोग बळावण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे.

सध्या कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनावर उपचारांसाठी प्रतिजैविकांचा पर्याय वापरला जात आहे. तो पर्याय बऱ्यापैकी यशस्वीही ठरत आहे. पण, याच प्रतिजैविकांचा अतिवापर गुप्तरोगाला निमंत्रण देणारा ठरत आहे. या प्रतिजैविकांमधील एझिथ्रोमायसिन नावाच्या औषधाच्या अतिवापरामुळे सुपर गोनोरिया होण्याची शक्यता वाढली आहे.

काय आहे सुपर गोनोरिया

हा रोग निसीरिया गोनोरिया नावाच्या विषाणूमुळे होतो. असुरक्षित लैंगिक संबंध, मुखमैथुन (ओरल सेक्स) आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांमुळे याचं संक्रमण होतं.

कोरोनावर वापरण्यात येणाऱ्या प्रतिजैविकांमुळे सुपर गोनोरियावरील औषधाचा परिणाम होणं वेगाने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तर हा आजार कधीच बरा होणार नाही

ब्रिटनमधील बायोटासफेरिक लिमिटेड या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर हीच परिस्थिती राहिली तर सुपर गोनोरिया या आजारावर कधीच उपचार होऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे जर औषधाचा परिणाम होम हा रोग कायमस्वरुपी तसाच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.