कोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे

739

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाच्या काळात कंपन्या, गुत्तेदार, कंत्राटदारांनी माणुसकी दाखवून त्यांच्याकडील कामगारांच्या पोटापाण्याची सोय करावी असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज करत आहेत. मात्र त्यांच्या आवाहनाला हरताळ फासण्यात येत असल्याचे संतापजनक चित्र बघायला मिळत आहे. शहरात रोजगारासाठी परराज्यातून आलेल्या कामगारांना कंपन्या, कंत्राटदार, बिल्डरांनी देवाच्या भरवशावर सोडून दिले आहे. घराकडे जाण्यासाठी काहीच वाहन मिळत नसल्यामुळे या कामगारांनी पायीच दर कोस दर मुक्काम करीत घराकडची वाट धरली आहे.

संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतियांची संख्या हजारोंच्या घरात आहे. दोन‌ वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी हे लोक पडेल ते काम करतात. कंपन्यामध्ये रोजंदारीवर काम करणारे शेकडो परप्रांतीय आहेत. काही कंपन्या तर या कामगारांची राहण्या, खाण्याचीही सोय करतात. मोठमोठ्या बिल्डर्सकडे बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा राज्यांमधून आलेले कामगार काम करतात. जालना शहरात असलेल्या स्टीलहबमध्येही परप्रांतीय कामगार हजारोंच्या संख्येने आहेत.

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. जिल्हाबंदी, राज्यबंदी करण्यात आली. वाहतूक थांबवण्यात आली. याचा सर्वाधिक फटका या परप्रांतीय कामगारांना बसला. रोजंदारी बंद झाली. कंपन्या, कंत्राटदारांनी वार्यावर‌ सोडले. घरी जाण्यासाठी काही साधन नाही. यामुळे या कामगारांनी घर गाठण्यासाठी पायीच दिंडी काढली आहे. कधी पोहचू हे माहिती नाही, वाटेत खायला काही मिळेल का याची शाश्वती नाही. बीड बायपासवर हा तरूणांचा जत्था भेटला. गांधेली शिवारात रोजंदारी करत होतो. पण दोन दिवसांपासून खाण्याचे‌‌ वांधे झालेत. ज्यांच्याकडे काम करत होतो, त्यांनी पाठ फिरवली. म्हणून आता घराकडे निघालो असे या तरूणांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या