पालिकेचे ‘मिशन क्लोज कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’ वेगात!

363

कोरोनाला रोखण्यासाठी पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून आता ‘क्लोज कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’ मोहिमेचा वेग दुपटीने वाढवण्यात आला आहे. यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून दररोज 14 हजार निकट संपर्क शोधून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. 10 ते 14 सप्टेंबर या केवळ पाच दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांचे तब्बल 66 हजार 550 निकट संपर्क शोधण्यात आले आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत एकूण रुग्णसंख्या 1,71,949 झाली आहे. त्यामुळे पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी आणि कार्यवाहीचा वेग वाढवला आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास जास्तीत जास्त निकट संपर्क शोधून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या किमान 10 ते 15 जणांचा शोध घेतला जात आहे. यातील लक्षणे असलेल्यांची तातडीने चाचणी किंवा क्वारंटाईन करण्यात येत आहे. यामधून पॉझिटिव्ह आढळल्यास कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार करणे, संबंधिताच्या क्लोज कॉण्टॅक्टचा शोध घेणे अशी प्रक्रिया पार पाडली जात आहे. पॉझिटिव्ह असूनही लक्षणे नसल्यास आणि संबंधितांच्या घरी क्वारंटाईनची व्यवस्था असल्यास, स्वतंत्र स्वच्छतागृह असल्यास तशी सवलतही दिली जात आहे. गेल्या महिनाभरापासून दररोज सुमारे 5 ते 7 हजार निकट संपर्क शोधण्यात येत होते. मात्र आता हीच संख्या 12 ते 14 हजारापर्यंत वाढविण्यात आली आहे.

11 हजार पॉझिटिव्ह कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल

पाच दिवसांत शोधलेल्या 66 हजार 550 निकट संपर्क रुग्णांपैकी 11 हजार 483 रुग्णांना पालिकेच्या ‘कोविड केअर सेंटर-1’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पालिकेच्या आरोग्य विभागाने 24 विभागांमध्ये आरोग्य स्वयंसेविका व स्थानिक स्वयंसेवक घरोघरी व झोपडपट्टीत जाऊन सर्वेक्षण करत आहेत. सर्वेक्षणासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत.

याशिवाय मोबाईल डिस्पेनसरी, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्ण आणि निकट संपर्क शोधले जात आहेत. दरम्यान, मुंबईत 14 सप्टेंबरपर्यंत 9 लाख 25 हजार 148 व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या