
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल असलेल्यांना घरी पाठवण्याबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीचा चाचणीसाठी पाठविलेला नमुना निगेटीव्ह आला तर त्याला घरी पाठवून 14 दिवसापर्यंत त्याच्या प्रकृतीचा आढावा घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात दाखल व्यक्तींना घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात तीन नव्या संशयित रुग्णांना प्रतिबंधात्मक उपायांसाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या 12 जण निरीक्षणाखाली आहेत. संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 020- 26127394 असा आहे.
चीनच्या ऊवान प्रांतातून हिंदुस्थानातील प्रवाशांना घेऊन येणारे विमान दोन दिवसांत दिल्ली येथे दाखल होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 26 प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला दिली आहे. या 26 प्रवाशांना दिल्ली येथे उतरून तेथेच त्यांची तपासणी करून निरीक्षण कक्षामध्ये दाखल केल्यानंतर 14 दिवसांनंतर ते महाराष्ट्रात परततील, असे केंद्र शासनाकडून सांगण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे भेट देऊन कोरोना विषयक प्रतिबंध व नियंत्रण विषयक उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना कोरोना संदर्भात विभाग करत असलेल्या विविध बाबींची माहिती दिली.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील नायडू रुग्णालय येथे 5 जण दाखल आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथे प्रत्येकी एकजण दाखल आहे. त्यापैकी 9 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याबाबतचे अहवाल एनआयव्ही पुणे यांनी दिले आहे. तर इतर 3 जणांचे अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून आतापर्यंत 5128 इतके प्रवासी तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी 4 प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर क्षेत्रीय सर्वेक्षणात राज्यात आणखी 32 प्रवासी असे एकूण 36 प्रवासी आढळले आहेत. सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्य स्थितीबाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. कोरोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 104 उपलब्ध करण्यात आला आहे. कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि आरोग्य शिक्षण विषयक साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.




























































