
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. हिंदुस्थानातही त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारतर्फे अनेक राज्ये लॉकडाऊन करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवांपैकी एक असलेल्या बँकिंग सेवेतही काही बदल करण्यात आले आहेत.
खासगी क्षेत्रातील बँकांनी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आपल्या वेळांमध्ये बदल केले आहेत. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बँकांनी आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेळा अवघ्या चारच तास सुरू राहतील असं जाहीर केलं आहे. त्यामुळे या बँकांच्या सर्व शाखा फक्त 10 ते 2 याच वेळात सुरू राहतील. या आठवड्याच्या शुक्रवार पर्यंत या दोन्ही बँकांच्या सर्व शाखा खुल्या असतील आणि 28 मार्च रोजी चौथा शनिवार असल्याकारणाने बँका बंद राहणार आहेत.
आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना या बदलांची माहिती दिली असून या वेळांमध्ये अत्यंत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू राहमार आहे. त्यामुळे ग्राहकांनी शाखांमध्ये गर्दी करू नये, त्याऐवजी मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सुविधेचा लाभ घ्यावा. चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकावेत, असं आवाहन आयसीआयसीआयने केलं आहे. दुसरीकडे एचडीएफसी बँकेनेही 31 मार्चपर्यंत फोरेक्स सुविधा (परकीय चलन खरेदीची सुविधा) आणि पासबुक अपडेट करण्याच्या सुविधा बंद असल्याचं जाहीर केलं आहे.
31 मार्चपर्यंत बँकांमध्ये फक्त बेसिक पेमेंट, अमाउंट ट्रान्सफर, चेक क्लिअरन्स, कॅश डिपॉझिट करणे, कॅश काढणे इत्यादी महत्त्वाची कामे सुरू राहणार आहेत. कर्ज घेणे किंवा कर्जातील अटीशर्तींमध्ये बदल इत्यादी कामे या दिवसात होणार नाहीत.



























































