
जगभरात कोरोनाचे थैमान सुरुच असून काही देशांनी लॉकडाऊन मागे घेत, विविध निर्बंध हटवत जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाच संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणे आणि वाट पाहणे कोणत्याही देशाला शक्य नाही. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माणसामध्ये एखाद्या आजाराविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती असते. त्या प्रतिकारशक्तीचा उपयोग कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत करू शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रत्येक आजारा विरोधातील प्रतिकारशक्तीची मर्यादा असते. कोरोनाविरोधात लढणाऱ्या प्रतिकारशक्तीच्या मर्यादेचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.
कोणत्याही रोगाचे विषाणू शरीरात शिरल्यावर शरीरातील प्रतिकारशक्ती या विषाणूंशी सामना करते. त्यासाठी औषधोपचार घेतल्यावर रोगातून बरे झाल्यावर शरीर या विषाणूंशी सामना करण्यास तयार होते. या विषाणूंशी सामाना करण्याचे तंत्र प्रतिकारशक्तीला अवगत होते. त्यामुळे पुन्हा अशा विषाणूंनी हल्ला केल्यास शरीरातील प्रतिकारशक्तीला त्याच्याशी मुकाबला करण्याचे तंत्र अवगत असते. त्यामुळे अशा आजाराचे आपल्याला संक्रमण होण्याआधीच प्रतिकारशक्ती त्यावर मात करते. मात्र, विविध आजारासाठीची शरीराच्या प्रतिकारशक्तीची मर्यादा असते. कांजण्यासारख्या आजारातून व्यक्ती बरी झाल्यावर कांजण्याच्या विषाणूशी लढण्याची माणसाची प्रतिकारशक्ती आयुष्यभर कायम राहते. त्यामुळे कांजण्यासारखे आजार एकदाच होऊ शकतात. तर थंडी, ताप यासारख्या आजारांवर शरीराची प्रतिकारशक्ती काही महिने किंवा वर्षभरच काम करते. त्यामुळे एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी असल्यास अशा व्यक्तींना सर्दी, ताप असे आजार नेहमी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, एचआयव्ही, कर्करोग यासारख्या आजाराविरोधात लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती अद्याप विकसीत झालेली नाही.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोणतीही लस किंवा औषधोपचार नाही. त्यामुळे या विषांणूविरोधात लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल, याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. मात्र, सार्स वर्गातील विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती दोन वर्षे कायम राहते. त्यामुळे कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती किमान वर्षभर टिकेल, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे विषाणू सार्स वर्गातील असल्याने या रोगावर मात केली तरी याचे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी सांगितले. फक्त या विषाणूंशी सामना करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती तयार असेल, असेही संशोकांनी सांगितले. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला वर्षभरात पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असणार आहे, अशी माहिती हॉवर्ड विद्यापीठातील साथरोग संशोधक मार्क लिपसिटच यांनी सांगितले.

























































