
कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या आषाढीवारीला भाविकांना येण्यास मनाई असल्याने आषाढी एकादशीचा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. मानाच्या संतांच्या पादुकांना मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत चंद्रभागेत स्नान घालण्यात आले, यानंतर नगरप्रदक्षिणा झाली. दरम्यान, श्री विठ्ठलाचा रथोत्सव यंदा ट्रक्टरमधून निघाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाविक व मानकरी सहभागी झाले होते.
दरवर्षी आषाढीवारी दहा ते बारा लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरी होत असते. संतांच्या पादुकांचे स्नान तसेच नगरप्रदक्षिणा व रथयात्रा पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी लाखो भाविक उपस्थित असतात. यंदा कोरोनामुळे सगळे चित्रच पालटले आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्यासह आलेल्या मानाच्या सर्वच पालख्या चंद्रभागेत स्नानासाठी आल्या होत्या. हाताच्या बोटावर मोजण्याइतके भाविक यात सहभागी झाले होते. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नगरप्रदक्षिणा करण्यात आली. पंढरपूर शहरात संचारबंदी पुकारण्यात आल्याने स्थानिक नागरिकही घरातच बसून होते. रस्त्यांवर नीरव शांतता होती. याच वातावरणात संतांच्या पालख्या व मोजके वारकरी प्रदक्षिणा मार्गावर टाळ-मृदंगांचा निनाद अन् हरिनामाचा गजर करताना दिसत होते.
दरम्यान, प्रतिवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रखुमाई व राहीदेवी यांच्या मूर्ती असणारा रथ प्रदक्षिणा मार्गावरून काढला जातो. तो ओढण्यासाठी मोठी गर्दी असते. तसेच या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची धडपड असते. यंदा रथोत्सव मोजक्याच भाविक, मानकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ट्रक्टरमधून रथोत्सव
आषाढी एकादशीला निघणाऱया श्री विठ्ठलाच्या रथोत्सवासाठी आकर्षक व भव्य लाकडी रथ आहे. परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी याचा वापर होतो. यंदा कोरोनामुळे आरोग्यविषयक नियम पाळत हा उपक्रम पार पडला. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी परंपरेप्रमाणे हाताने ओढला जाणारा लाकडी रथ न वापरता देवांच्या मूर्ती ट्रक्टरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
आषाढी एकदशीनिमित्त झालेल्या श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व नियम पाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मंदिर समिती आणि प्रशासनाने दक्षता आणि योग्य खबरदारी घेतली होती



























































