या गावाचे कौतुक झालेच पाहिजे! कुरुळ गावातील गुरुवारचा जनता कर्फ्यू 100% यशस्वी

827

देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन सुरू आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक राज्यांनी तो पुढे वाढवावा अशी मागणी केली असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढतो अथवा नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी लोकं बिनधास्तपणे बाहेर फिरत असतानाची दृश्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एका छोट्याशा गावाने स्वयंशिस्त पाळत गुरुवारी जनता कर्फ्यूची पाळणार असल्याची घोषणा केली. ग्रामस्थांनी हा निर्णय डोक्यावर उचलून धरला आणि हा कर्फ्यू 100 टक्के यशस्वी झाला. इतर दिवशीही गर्दी न करण्याचं आणि कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं इथल्या ग्रामस्थांनी ठरवलं आहे.

अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरूळ ग्रामपंचायतीने या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. ‘एक दिवस गावासाठी’ ही त्यामागची संकल्पना होती. इथले सरपंच जनार्दन पाटील यांनी गावातील कुठल्याही व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लॉकडाऊन अधिक गांभीर्याने घ्यायचं ठरवलं आहे. जनता कर्फ्यू असो किंवा इतर दिवशी घरात बसण्याचे आवाहन असो हे तुमच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे हे त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं. गुरुवारी जनता कर्फ्यू पाळला जाईल अशी घोषणा करण्यात आली आणि या गावात सकाळी 7 ते रात्री 8 संपूर्ण गाव घरात थांबलेलं पाहायला मिळालं.

आपली प्रतिक्रिया द्या