
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत. अनेकांनी या संकटावर मोठ्या हिमतीने मात करण्याची धडपड सुरू ठेवली आहे. तमिळनाडूमधल्या कुद्दलोर जिल्ह्यातील नेयवेली गावचे रहिवासी असलले टी.महेश्वरनही (वय वर्षे-30) त्यातलेच एक आहेत. महेश्वरन हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांना संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या, त्या अजूनही उघडलेल्या नाहीयेत. यामुळे महेश्वरन यांना शिक्षण संस्थेने नोकरीवरून काढून टाकलं.
महेश्वरन हे बी.टेक असून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्यांची बायको तिथिराई सेल्वन हिने देखील भोतिकशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. चांगलं शिक्षण असूनही महेश्वरन यांना नोकरी मिळवताना नाकी नऊ आले आहेत. ते ज्या संस्थेमध्ये शिकवत होते तिथे त्यांना 3-4 नवे विद्यार्थी घेऊन या त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा मग तुम्हाला नोकरीवर घेऊ असं सांगितलं. महेश्वरन यांनी इतर कॉलेजमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना 15000 पगार देऊ असं सांगितलं. इथेही कॉलेज प्रशासनाने त्यांच्यापुढे नवे विद्यार्थी आणा अशी अट घातलेली होती. या प्रकाराला कंटाळून महेश्वरन यांनी नोकरी नकोच असं ठरवलं.
महेश्वरन यांची सहा महिन्यांची मुलगी असून वयोवृद्ध वडिलांची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. महेश्वरन यांच्या कुटुंबीयांचे एक भाजीपाल्याचे दुकान आहे. या दुकानामध्ये त्यांनी घरी बनवलेल्या चकल्या विकायला सुरुवात केली. चकल्या विकून त्यांना दिवसाला 500 रुपयांपर्यंत कमाई व्हायला लागली आहे. या व्यवसायातून त्यांना पुढे चांगला फायदा होईल अशी आशा वाटत आहे.
























































