कोरोनाचे नियम पाळून शाळांची घंटा वाजली

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली. आजपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत होता. मास्क, तापमान, ऑक्सिजन पातळी तपासून, सॅनिटायझर देऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत होता. अनेक पालकांनी संमतीपत्र न दिल्याने विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती दिसून येत होती. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण न झाल्याने काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर येत आहे.

सातारा जिह्यात 90 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

कोरोनाच्या भीतीमुळे मागील आठ महिन्यांपासून सातारा जिह्यातील बंद असलेल्या शाळा आज पुन्हा गजबजल्या. धास्तीच्या वातावरणात; परंतु आवश्यक ती काळजी घेऊन आजपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यास विद्यार्थ्यांची जवळपास 80 ते 90 टक्के उपस्थिती लाभली.

जिह्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून 10 हजार 221 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. पैकी 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील लक्षणे नसलेल्या शिक्षक व कर्मचाऱयांना होम आयसोलेट, तर सौम्य लक्षणे किंवा त्रास असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर आजपासून जिह्यात नववी ते बारावीचे वर्ग भरवण्यास सुरुवात झाली. 25 पर्यंतचा पट असेल तर सर्वांना एकावेळी शिकवण्यात येईल, तर त्याहून अधिक पट असल्यास निम्म्या विद्यार्थ्यांना आज आणि राहिलेल्या निम्म्या विद्यार्थ्यांना उद्या याप्रमाणे एकच पाठ शिकवला जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी जिह्यात शाळेमध्ये 80 ते 90 टक्के विद्यार्थी उपस्थित राहिल्याचे शाळा व्यवस्थापनांनी सांगितले.

कोल्हापुरातील 1024 पैकी 321 शाळा सुरू

जिह्यातील माध्यमिक शाळा आज काही प्रमाणात सुरू झाल्या. 7 डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी शिक्षण विभाग आणि संस्थाचालकांना सूचना दिल्या आहेत. 1 हजार 24 माध्यमिक शाळांपैकी आज 321 शाळा सुरू झाल्या असून, 18 हजार 569 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावल्याचे झेडपी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.

करवीर तालुक्यात सर्वाधिक 116 पैकी 58 माध्यमिक शाळा सुरू होऊन 2 हजार 815 विद्यार्थी उपस्थित राहिले. चंदगडसारख्या दुर्गम तालुक्यातही 75 पैकी 31 शाळा उघडल्या, तर 1 हजार 508 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जिह्यात सर्वांत कमी प्रतिसाद आजरा तालुक्यात मिळाला. येथे 35 पैकी केवळ 5 शाळा सुरू होऊन केवळ 195 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कोल्हापूर शहरातही 112 पैकी केवळ 10 शाळा सुरू झाल्या, तर 289 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

जिह्यात 9वी ते 10वीचे एकूण 1 लाख 19 हजार 627 आणि 11वी ते 12वीचे एकूण 1 लाख 4 हजार 816 विद्यार्थी आहेत. तर, 9 हजार 679 शिक्षक आणि 5 हजार 473 शिक्षकेतर आहेत. यामधील 5 हजार 155 शिक्षकांची आणि 1 हजार 742 शिक्षकेतर अशी एकूण 6 हजार 897 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. अजून 8 हजार 255 जणांची तपासणी शिल्लक आहे. तपासणी केलेल्यांपैकी 28 शिक्षक आणि 18 शिक्षकेतर अशा एकूण 46 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या