
>> सुजित पाटकर
‘आजारा’चाही कसा उद्योग होतो याचे ताजे उदाहरण म्हणजे कोरोना व्हायरस. चीनच्या जन्मभूमीतून निघालेला कोरोना व्हायरस आता हिंदुस्थानात पोहोचला आहे व भारतभ्रमण करू लागला आहे. कोरोनाबाबत जे खोटेनाटे पसरवले जात आहे तो अफवांचा बाजार नसून वेगळा आजार आहे.
सारे जग सध्या ‘मास्क’मय झाल्याचे चित्र दिसत आहे. विविध रंगांचे आणि बनावटीचे ‘मास्क’ तोंडावर बांधून लोकांचा वावर सुरू आहे. कोरोना व्हायरस ‘मास्क’ भेदून तोंड व नाकाच्या वाटेने शरीरात घुसणार नाही अशा खुळय़ा समजुतीत अर्धे जग सध्या श्वास घेत आहे. पण ‘कोरोना’विषयी गैरसमजाचेच व्हायरस सगळय़ात जास्त वळवळताना दिसत आहे. हा संपूर्ण विषय गंभीर आहे. एखादा अणुबॉम्ब अचानक पडावा तसा हा ‘कोरोना’ बॉम्ब पडला व सर्वकाही अत्यवस्थ झाले. एका कोरोना व्हायरसमुळे 150 कोटी लोकसंख्येचा चीन आपल्याच घरात ‘बंदिवान’झाला आहे. सर्व रस्ते वीरान पडले आहेत. व्यापार, उद्योग, शेती, व्यवसाय कोसळला आहे. चीनचे अध्यक्ष स्वतः भूमिगत झाले होते, ते आता उगवले आहेत. एक सूक्ष्म जंतू. जगाला डोळे वटारून दाखवणाऱया चीनला त्याने थंड आणि भयभीत केले आहे.
जगात अनेक प्रकारची वादळे विविध ‘नावे’ घेऊन जन्माला येतात. अगदी ‘सुनामी’पासून ‘निनो’पर्यंत. तसे आजाराचे झाले आहे. लक्षणे वेगळी नाहीत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी वगैरे. पण कधी स्वाइन फ्लू तर कधी सार्स, कधी इबोला तर कधी आणखी काही. आता कोरोना व्हायरस नावाचा विषाणू सैतान धुमाकूळ घालतो आहे. ‘आजारा’चाही कसा उद्योग होतो याचे ताजे उदाहरण म्हणजे कोरोना व्हायरस. चीनच्या जन्मभूमीतून निघालेला कोरोना व्हायरस आता हिंदुस्थानात पोहोचला आहे व भारतभ्रमण करू लागला आहे. आतापर्यंत पन्नासवर संशयित कोरोनाग्रस्तांची ओळख पटली आहे. कोरोनाने घुसखोरी करताच ‘मास्क’ आणि सॅनिटायझर्सचा काळाबाजार सुरू झाला. कधी 10, 20 आणि 50 रुपयांना मिळणारा मास्क मेडिकल स्टोअर्समध्ये 500-500 रुपयांना विकला जात आहे. पुन्हा हे मास्क त्या दर्जाचे खरेच आहेत काय? रुग्णालयात वापरले जाणारे ‘सर्जिकल मास्क’ अशा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सक्षम नाहीत, पण असे मास्क सर्रास विकले जात आहेत. परदेशात वापरून फेकलेला ‘मास्क’ आपल्याकडे विकण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उधळून लावला. भिवंडीत अशा वापरलेल्या ‘मास्क’चा मोठा साठा पकडला. धंदा आणि नफा यांचा विचार करण्याचा हा प्रसंग नाही. दुकानदारांनी सामाजिक जाणीव ठेवून अशा वेळी वर्तन करायला हवे. चुकीचे मास्क आणि सॅनिटायझर्सची विक्री करून आपण संकट वाढवीत आहोत. त्यामुळे ‘व्हायरस’ थांबण्याऐवजी पसरत जाईल. हे अमानुष आहे, अतिरेकीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा संकटांचा तरी व्यापार करू नका. असे करणे हे राष्ट्रभक्तीचे लक्षण नक्कीच नाही. निदान ‘लोकप्रतिनिधी’ वगैरे पदव्या मिरवणाऱयांनी तरी लोकांची फसवणूक करू नये. लोकांच्या मनात भीती आहे. त्या भीतीचे रूपांतर ‘दहशती’त करू नये, पण आम्ही धर्माचे राजकारण करतो तसे आजाराचेही राजकारण करीत आहोत.
अमरावतीच्या महिला खासदार नवनीत राणा यांनी मागच्या आठवडय़ात तोंडावर ‘मास्क’ बांधून लोकसभेत भाषण केले. कोरोनाचे गांभीर्य दाखवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न असेलही, पण त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने मास्क लावला होता. श्वसनातून व्हायरसचा संसर्ग होतो, पण नवनीत राणा यांनी नाकपुडय़ा उघडय़ा ठेवून ओठांवर ‘मास्क’ बांधला होता. या छायाचित्रावर भरपूर टीका झाली. लोकांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. एका आमदाराने दंड थोपटत कोरोना व्हायरसला आव्हान दिले की, ‘‘हिंमत असेल तर माझ्या मतदारसंघात घुसून दाखव.’’ म्हणजे हा नवीनच जादूटोणा म्हणायला हवा. या महाशयांच्या मतदारसंघातील लोकांनी कोरोनासंदर्भात कोणतीही सावधगिरी बाळगायची नाही, स्वच्छता वगैरे पाळायची नाही. कारण त्यांचे आमदार महाशय एकटेच त्या कोरोना व्हायरसशी झुंज देऊन त्यास पळवून लावणार आहेत. मग या आमदारांना कोरोना व्हायरसची जन्मभूमी ‘चीन’लाच पाठवायला हवे.
रामदास आठवले तर त्यांच्याही पुढे गेले. रस्त्यावर काही लोकांसह उतरले व ‘कोरोना गो… कोरोना गो…’ असा गजर त्यांनी केला. ही वेगळीच जादू म्हणावी लागेल. तिथे सर्व मातब्बर चिनी हतबल झाले आहेत व आपल्या आप्तांची मरणे उघडय़ा डोळय़ांनी पाहात आहेत. अशा जंतर मंतर वैद्यबुवांना चीनच्या सीमेवरच नेमले व काही काळासाठी ठेवले तर चीनमधून हा व्हायरस हिंदुस्थानात घुसण्याची काय बिशाद आहे! कोरोनाबाबत जे खोटेनाटे पसरवले जात आहे तो अफवांचा बाजार नसून वेगळा आजार आहे. कोंबडी खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेने पोल्ट्रीचा धंदा कोसळला, तर अनेक भागांतील पोल्ट्री मालकांनी लाखो कोंबडय़ांना जिवंत पुरले. इथे खरं तर प्राणी-पक्षीमित्रांनी धाव घ्यायला हवी. जगात एक ‘कोरोना’ नावाची बीअर प्रख्यात आहे. ‘कोरोना व्हायरस’मुळे या बीअरचा खप इतका खालावला की, लोक भीतीने ‘कोरोना’ नावाची बीअर प्यायला घाबरत आहेत. नोव्हेल कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी चीन पराकाष्ठा करीत आहे. चीन हा कालपर्यंत पोलादी भिंतीआडची महासत्ता होती. या महामारीने महासत्ता अतिदक्षता विभागात जणू हतबल होऊन पडली आहे. अर्थव्यवस्थेस सुरुंग लागला तसे राज्यव्यवस्थेसही तडे गेले आहेत. चीनला मदतीचा हात अनेकांनी पुढे केला तो काही चीनवर प्रेम उतू चालले आहे म्हणून नाही, तर चीनमधील ही महामारी संपली नाही तर हा संसर्ग आपल्या देशात पोहोचेल म्हणून. एखाद्या विषाणूने जग इतके चिंतित कधीच झाले नव्हते. इटलीमध्ये दीड कोटी लोकांना घरातच ‘बंदी’ बनवले गेले आहे. जगाची चिंता कोरोना व्हायरसने वाढवली. मजबूत अर्थव्यवस्था, संरक्षण सामग्रीचे भांडार असतानाही एक विषाणू साम्राज्य खिळखिळे करतो. त्या विषाणूच्या नावानेही अनेक देशांत नवा बाजार निर्माण झाला. धंदा कधीच मरत नाही. संकट ही संधी असते, पण त्यातून मास्कचा धंदाही होतोय. सगळय़ांनाच ‘संकटातून’ व्यापाराची संधी शोधायची आहे. मग माणुसकी गेली चुलीत. शेवटी सांगायचे ते इतकेच की, प्रत्येक सर्दी आणि खोकला म्हणजे ‘कोरोना’ असू शकत नाही. महाराष्ट्राचे सरकार कोरोनाशी लढण्यास समर्थ आहे. लोकांनी उगाच घाबरून जाऊ नये. फक्त काळजी घ्या, म्हणजे झाले.
मास्क कोणता वापरायचा?
मास्कचा वापर केल्याने संसर्ग किती टाळता येतो याविषयी जगभरातले तज्ञ साशंक आहेत, पण तरीसुद्धा काही प्रमाणात संरक्षण हे मास्क आपल्याला देऊ शकतात. सध्या जगभरातील लोक दोन प्रकारचे मास्क वापरताना दिसत आहेत. यामध्ये पहिला मास्क आहे तो म्हणजे सर्जिकल मास्क. हा मास्क डॉक्टर किंवा रुग्णालयामध्ये वापरला जातो. हा मास्क अतिशय पातळ आहे आणि वापरायलासुद्धा सोपा आहे आणि किमतीनेसुद्धा कमी आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे हा मास्क तुम्हाला जास्त संरक्षण देणार नाही. शिंकल्यानंतर येणारे कण हा मास्क रोखू शकतो, पण बारीक सूक्ष्म कण या मास्कमधून आरपार जाऊ शकतात.
दुसऱया प्रकारचा मास्क आहे तो म्हणजे ऱ95 मास्क. या मास्कला ऱ95 म्हणतात कारण 95 टक्के हा मास्क कण रोखू शकतो. म्हणून या मास्कचे नाव ऱ95 आहे. या मास्कला पुढे एक फिल्टर असतो. जेणेकरून तुम्ही श्वास घेताना सगळय़ा गोष्टी गाळल्या जाऊ शकतात. हा मास्क तुलनेने तुम्हाला जास्त संरक्षण देऊ शकतो. कारण या मास्कमुळे तुमचे नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होते. शिवाय यातून श्वास घेणेही सोपे जाते आणि अडथळाही येत नाही.
या तीन गोष्टींची काळजी नक्की घ्या!
कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेऊ शकतो ते पहा –
कोरोना व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीकडे कसा जातो याची पूर्ण माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. पण यांच्यासारखे जे विषाणू आहेत, व्यक्ती शिंकली किंवा खोकल्यावर जे तुषार उडतात त्यातून एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीकडे संक्रमित होतात. हा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून आपण या काही गोष्टी नक्की करू शकतो.
कोणत्याही विषाणूची लागण होऊ नये यासाठी वारंवार हात धुणं हा सर्वोत्तम उपाय असल्याचे संपूर्ण जगभरातल्या तज्ञांनी म्हटले आहे. पण हो, घाईघाईने हात धुऊन चालणार नाही. योग्य रीतीने हात धुतले तरच तुमच्या हातावर असलेले विषाणू निघून जातील. सगळय़ात आधी हात ओले करा, हातात साबण घ्या आणि हात चोळून फेस काढा. पूर्ण हात स्वच्छपणे साफ करून घ्या. नख आणि तळहातदेखील स्वच्छ करा.
हात स्वच्छ करण्यासाठीचा आणखीन एक पर्याय तो म्हणजे हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे. पण सॅनिटायझरची उपयुक्तता मर्यादित आहे. त्यामुळे हात धुणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
हा विषाणू शिरकाव करू शकतो ते तुमच्या चेहऱयामार्फत. म्हणजेच तोंड, नाक, डोळे आणि कान यांच्यामार्फतच आपल्याला इन्फेक्शन्स होत असतात. म्हणून चेहऱयाला वारंवार हात लावणे टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना तोंड झाका आणि मग हात इतर कुठेही लागू देऊ नका. शिंकताना किंवा खोकताना हाताचा वापर केल्यास लगेच हात धुणे महत्त्वाचे आहे. टिश्यूपेपर वापरणे कधीही चांगले. कारण तो एकदा वापरल्यानंतर आपण तो फेकून देतो.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)






























































