कोरोना रुग्णाला चावलेला डास आपल्याला चावल्यास कोरोना होईल ?

कोरोनाची दुसरी लाट अजूनही हिंदुस्थानसाठी त्रासदायक ठरते आहे. त्यातच तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशात दररोज जवळपास 4 लाखांच्या आसपास नागरीक बाधित होत आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली असून याचा फायदा काहीजण उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या या काळात व्हॉटसअपवर बरेच मेसेज व्हायरल झाले आहेत. यातील काही मेसेजवर भरोसा ठेवून काहीजण तसे प्रयोग करून पाहतात.

जागतिक आरोग्य संघटनेने वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही व्हायरल मेसेजवर भरोसा ठेवून औषधे खाऊ नयेत असं वारंवार सांगितलं आहे.  गेले काही दिवस काही अफवा जोरात पसरत असून त्यातल्या काही अफवांचे जागतिक आरोग्य संघटनेने खंडण केले आहे.

डासद्वारेही कोरोनाचा फैलाव होतो?

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की या दाव्याला बळकटी देणारा एकही पुरावा आजपर्यंत सापडलेला नाहीये. कोरोना आजार हा डास चावल्याने फैलावत असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावला आहे. कोरोनाग्रस्ताला डास चावल्यानंतर डासाच्या शरीरात कोरोनाचे विषाणू जिवंत राहात नाहीत असं संशोधकांनी सांगितलं आहे. डासाच्या शरीरात हा विषाणू जिवंत राहात नसल्याने कोरोनाग्रस्ताला चावलेला डास निरोगी माणसाला चावला तरी त्याला कोरोनाची लागण होत नाही.

कोरोनाची लागणी विषाणूमुळे होते, जंतूमुळे नाही

कोरोनाचा विषाणू हा विरीडे नावाच्या विषाणू गटातला आहे. या विषाणूवर अँटीबायोटीक काम करत नाहीत. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला इतर कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी अँटीबायोटीक औषधे दिली जातात.

आयुर्वेदीक औषधांनी कोरोना बरा होतो?

अनेकांचा समज आहे की हर्बल किंवा आयुर्वेदीक औषधांनी कोरोना बरा होतो आणि कोरोनाचा फैलावही रोखता येतो. काही आयुर्वेदीक औषधे ठराविक आजारांवर गुणकारी नक्कीच ठरतात, मात्र आयुर्वेदीक औषधे कोरोना बरा करण्यासाठी गुणकारी असतात या दाव्याला अजूनपर्यंत पुष्टी मिळालेली नाहीये.

घरातील माश्यांमुळे कोरोना पसरतो ?

या दाव्यालाही पुष्टी देणारे पुरावे सापडलेले नाहीयेत. एखादी कोरोनाबाधित व्यक्ती शिंकली किंवा खोकल्यानंतर त्याच्या नाकातोंडातून जर कण बाहेर पडले आणि ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते झाले तर त्याला कोरोनाची लागण होऊ शकते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही कोरोना होतो.

5जी नेटवर्कमुळे कोरोना होतो ?

जागतिक आरोग्य संघटनेने हा दावादेखील चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. याबाबतचे सगळे मेसेज हे खोटे, खोडसाळ असल्याचंही आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. 5जी नेटवर्कमधील तरंगांसोबत कोरोनाचे विषाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करू शकत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या