कोरोनामुक्त मुंबईसाठी वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून काम करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

207

कोरोनामुक्त मुंबईसाठी पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी वॉर्डनिहाय युनिट स्थापन करावे. विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणीच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना वॉर्डनिहाय या समित्यांची नोंदणी करण्याची सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावरील उपचारासंदर्भात महापालिका अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे संवाद साधला. परिवहन मंत्री अनिल परब, पालिकेचे आयुक्त आय.एस. चहल यावेळी उपस्थित होते.

चेस द व्हायरस चे काम महापालिका करत आहे. ती ठिकाणी सोडून इतर ठिकाणी `चेस द व्हायरस’ ही संकल्पना राबविण्यासाठी स्वंयसेवी संस्थाची मदत घ्यावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य व सुरक्षाविषयक साधने पुरवण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोरोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेची, मास्क, सॅनिटायझर वापरण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दत्तक वस्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याची तसेच योजनेची पुनर्रचना करण्याची मागणी केली. यामुळे अधिक सहजपणे लोकांच्या घरापर्यंत पोहोचता येईल असे ते म्हणाले.

महापालिका आयुक्त चहल यांनी धारवीच्या कोरोना यशात सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा एक भाग अतिशय महत्त्वाचा ठरला असल्याचे सांगतांना त्यांनी मुंबईत स्वंयसेवी संस्थांचे ८३८ गट आणि त्याद्वारे ११ हजार लोक काम करत असल्याची माहिती दिली.

वेळेत उपचार केंद्रात पाठवा
स्वंयसेवी संस्थांच्या टीमने घरोघरी जाऊन तपासणी करतांना लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अधिकृत कोविड उपचार केंद्राकडे पाठवावे. लोकांच्या मनात विलगीकरणाबाबत असलेली भीती काढून टाकण्यासाठीचे मार्गदर्शन, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि कॉरंटाईनच्या कामातही कदत करण्याची भूमिका ही एनजीओनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.

फवारणीच्या कामात मदत
पावसाळ्यातील साथीचे आजार दूर ठेवण्यासाठी स्वंयसेवी संस्थांच्या टीमच्या सहकार्याने रस्ते, बांधकामाधीन इमारती, पूल बांधकामे याठिकाणी निर्जुंतुकीकरणाचे, धूर फवारणीचे काम केले जावे. परराज्यातील कामगार यावेळी निघून गेल्याने विकासकांवर ही जबाबदारी पूर्णत: सोपवता येणार नाही आणि एकट्या महापालिकेलाही हे काम करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत एनजीओचे सहकार्य घेऊन फवारणीचे काम करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या