
देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची धडधड वाढली आहे. मागील काही आठवडय़ांत ओसरलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा भयानक उसळी घेतली आहे. सोमवारी दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल 90 टक्क्यांची वाढ होऊन 24 तासांत 2183 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा या राज्यांतील रुग्णवाढीने संपूर्ण देशाला चिंतेत टाकले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात रविवारी 1150 नवे रुग्ण आढळले होते. त्यात 24 तासांत 90 टक्क्यांची वाढ झाली आणि सोमवारी 2183 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 214 बाधितांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट धडकली होती. त्यानंतर पुढील काही आठवडे रुग्णसंख्येत झपाटय़ाने घट झाली होती. मात्र मागील काही दिवसांत ठरावीक राज्यांमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्णसंख्येचा हा चढता आलेख कोरोनाच्या चौथ्या लाटेला निमंत्रण देऊ शकतो, अशी भीती सतावत आहे.
चौथी लाट येण्याची शक्यता नाही! कानपूर आयआयटीच्या प्राध्यापकाचा दावा
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच कानपूर आयआयटीचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी दिलासादायी दावा केला आहे. देशात कोरोनाची चौथी लाट धडकण्याची शक्यता नाही. कोटय़वधींच्या लोकसंख्येत 70-80 रुग्ण आढळले, तर त्याआधारे कोरोना संसर्गाच्या गंभीरतेचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. देशात सध्या विषाणूच्या जुन्याच म्युटेंटचा परिणाम दिसत आहे, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, अग्रवाल यांचे आधीच्या तीन लाटांबाबतचे अंदाज जवळपास खरे ठरले होते.
उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणाने चिंता वाढवली
उत्तर प्रदेश, दिल्ली, केरळ व हरयाणा या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा स्फोट झाला आहे. उत्तर प्रदेशात सोमवारी 115 नवीन रुग्ण आढळले, तर सक्रिय रुग्णसंख्या 605वर गेली. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, गौतम बुद्धनगरसह हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत व लखनौमध्ये रुग्ण वाढले आहेत. या शहरांत मास्कसक्ती लागू करीत योगी सरकारने सर्व जिह्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
- देशात 15 एप्रिलला 949 नवे रुग्ण आढळले होते. त्यात वाढ होऊन 16 एप्रिलला 975 नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी तब्बल 90 टक्क्यांची वाढ ही दैनंदिन रुग्णसंख्या रविवारच्या 1150वरून 2183वर पोहोचली.
रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे वाढते प्रमाण अधिक चिंतेचा विषय बनला आहे. सोमवारी 214 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात केरळच्या 213 व उत्तर प्रदेशच्या एका रुग्णाचा समावेश आहे. रविवारी केवळ 4 मृत्यू झाले होते.

























































