लढा यशस्वी होतोय… कोरोना परतीच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

मुंबईत दहा दिवसांपूर्वी दोनशेपार गेलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या सलग तीन दिवसांत कमालीची घटल्याने मुंबईला दिलासा मिळाला आहे. कोरोना संशयितांचा वेगाने शोध घेऊन क्वॉरेंटाईन करणे, चाचणी पद्धतीत सुधारणा, वेगाने होणाऱया चाचण्या आणि संशयितांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केले जाणारे सहायक उपचार यामुळे पालिकेच्या कोरोना विरोधातील लढय़ाला यश आले असून कोरोना परतीच्या वाटेवर निघाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सूचना-निर्देशानुसार कोरोनाविरोधात पालिकेच्या सुरू असलेल्या लढय़ाचा हा आढावा…

चाचणी पद्धतीमधील बदल ठरले परिणामकारक
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या अति जवळच्या (हाय रिस्क) गटातील लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तीची चाचणी लगेच केल्यास ती निगेटिव्ह येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशी चाचणी क्वारंन्टाईन केल्यानंतर पाच दिवसांनी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे अशा व्यक्तीचे वैद्यकीय निदान अचूक येण्यास मदत होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या अति जवळच्या (हाय रिस्क) कुटुंबातील अनेक व्यक्तींमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत नाहीत. अनेकदा लक्षणे न दिसणाऱयांची (Asymptomatic Patients) वैद्यकीय चाचणी केली असता, ती लागण झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीचे पाच दिवस ’फॉल्स निगेटिव्ह’ येत असल्याचेही निदर्शनाला आले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे पण त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र ’निगेटिव्ह’ येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ’फॉल्स निगेटिव्ह टेस्ट’ असे संबोधले जाते. त्यामुळे रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या संपर्कातील ‘हाय रिस्क’ गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी ही क्वारेन्टाईन केल्यानंतर पाच दिवसांनी करण्यात येत आहे.

मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या
कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पालिका मुंबईत मोठय़ा प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करत आहे. यानुसार 13 एप्रिल 2020 पर्यंत मुंबईत तब्बल 27 हजार 397 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 13 एप्रिलपर्यंत देशात एकूण 2 लाख 17 हजार 554 एवढय़ा चाचण्या झाल्या आहेत. देशातील एकूण चाचण्यांच्या 12.59 टक्के एवढय़ा वैद्यकीय चाचण्या या केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या खालोखाल केरळमध्ये 15 हजार 683, तामीळनाडूमध्ये 12 हजार 746, दिल्ली परिसरात 11 हजार 709 आणि देशातील इतर सर्व राज्यांमध्ये मिळून 1 लाख 50 हजार 19 एवढय़ा चाचण्या झाल्या आहेत.

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांकडून मिळतोय आत्मविश्वास
कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यापासून पालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱया उत्तम सुविधा, दर्जेदार उपचार, पुरेसा व पोषक आहार आणि डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार आणि सर्व आरोग्य कर्मचाऱयांकडून मिळणारी प्रेमळ वागणूक यामुळे मिळणाऱया आत्मविश्वासामुळेच आम्ही आता कोरोनामुक्त झालो आहोत अशी भावना घरी गेलेले रुग्ण व्यक्त करीत आहेत. ‘कोरोना बरा होतो, त्यामुळे तुम्हीही घाबरू नका’, असे आवाहनही ‘कोरोनामुक्त’ झालेल्यांकडून करण्यात येत आहे.

कंट्रोल रूममधील तक्रारींची तातडीने दखल
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरात अडकून पडले असले तरी पालिकेच्या माध्यमातून एका फोन कॉलवर काही मिनिटांतच तक्रारी-समस्या सोडवल्या जात आहेत. 4 मार्चपासून आतापर्यंत तब्बल 38 हजारांवर कॉल कंट्रोल रूममधील ’1916’ या क्रमांकावर आले आहेत.

संपर्क करा, मार्गदर्शन मिळवा
सर्दी, खोकला, कफ, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असल्यास दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येत आहे. त्यासाठी महापालिकेने ’022-47085085’ हा दूरध्वनी क्रमांकावर उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधीदरम्यान तज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय 1916 हा क्रमांक 24 तास मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रात संपर्क करावा असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

पालिकेसह खासगी 19 रुग्णालये
कोरोनावर उपचार, चाचणीसाठी पालिकेच्या रुग्णालयांसह 19 रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. पालिकेच्या रुग्णालयात मोफत चाचणी-उपचार केले जात आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कस्तुरबा रुग्णालयात, ’केईएम सर्वोपचार रुग्णालय’, ’लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय’, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय, ’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय, ’भाभा रुग्णालय’, वांद्रे, ’भाभा रुग्णालय’, कुर्ला, ’राजावाडी रुग्णालय’, घाटकोपर यांचा समावेश आहे. तर खासगी रुग्णलयांमध्ये ब्रिच कॅण्डी रुग्णालय, एच एन रिलायन्स रुग्णालय, लीलावती रुग्णालय, रहेजा रुग्णालय, हिंदुजा रुग्णालय, फोर्टीस रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल, वोक्हार्ट रुग्णालय, कोकीळाबेन रुग्णालय, नानावटी रुग्णालय, हिरानंदानी रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये सबर्बन डायग्नोस्टिक्स ः 022-6170-0019, थायरोकेअर ः 9702-466-333, मेट्रोपोलीसः 8422-801-801, सर एच एन? रिलायन्स ः 9820-043-966, एसआरएल लॅब या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याची सुविधा आहे.

बेघर, स्थलांतरितांची जबाबदारी घेतल्याने कोरोना प्रसाराला आळा
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मुंबईत रोजंदारी-स्थलांतरित कामगार, हजारो बेघर लोक अडकून पडले आहेत. त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था करून पालिकेने मोठी जबाबदारी पार पाडली आहे. असे हजारो लोक आहे त्याच ठिकाणी राहिल्याने कोरोना प्रसाराला आळा बसला आहे. यामध्ये पालिका नऊ लाख चपात्या, 31 हजार किलो भाजी आणि 90 हजार किलो खिचडी किंवा पुलाव देऊन दररोज एक लाख 57 हजार बेघर आणि स्थलांतरित कामगारांचा सांभाळ करीत आहे. या उपक्रमात दररोज दोन वेळच्या जेवणासाठी 3 लाख 14 हजार अन्न पाकिटांचे मोफत वितरणही करण्यात येत आहे. हे वितरण करण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेतले जात आहे. 30 मार्च 2020 पासून बृहन्मुंबई महापालिकेमार्फत दोन वेळच्या जेवणासाठी मोफत अन्न पाकिटे देण्यास सुरुवात करण्यात आली. या प्रत्येक पाकिटामध्ये 3 चपात्या, 100 ग्रॅम भाजी इत्यादी देण्यात येत आहेत तर काही वेळा सुमारे 350 ग्रॅम खिचडी किंवा पुलाव, अथवा राजमा चावल देण्यात येत आहे. हे वितरण 400 पेक्षा अधिक ठिकाणी निर्धारित वेळी दररोज करण्यात येत आहे. यासाठी ’बेस्ट’ उपक्रमाच्या गाडय़ांचा वापर करण्यात येत आहे. शिवाय या उपक्रमासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध धार्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था बचत गट, दानशूर व्यक्ती यांचा अतिशय मोलाचा हातभार लागत आहे. दूरध्वनी क्रमांक 1800-22-12-92/ 1916 यावर संपर्क साधल्यानंतर मदत मिळत आहे.

70 हजार कर्मचारी ऑनडय़ुटी
’कोरोना’ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असले तरी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी 70 हजार कर्मचारी दिवसरात्र लढा देत आहेत. यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, सुरक्षा आणि वाहतुकीसारख्या अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. पालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्याबरोबरच मुंबईकरांना नियमित पाणीपुरवठा करणे, स्वच्छता राखणे अशी अत्यावश्यक कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कंपन्या, उद्योगधंदे बंद असताना पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील 70 हजार कर्मचारी तीन पाळय़ांमध्ये काम करीत आहेत. यामध्ये पालिकेच्या आरोग्य खात्याकडून तीन हजारांवर डॉक्टरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण देऊन काम करून घेतले जात आहे. नियमित कर्मचायांबरोबरच अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी, घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करणाऱया साडेतीन हजार ’आशा’ वर्कर्स, ’बेस्ट’च्या वाहतूक आणि इलेक्ट्रिक विभागातील शेकडो कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत.

सोशल मीडियावरद्वारे समन्वय
पालिकेचे हजारो कर्मचारी फिल्डवर असताना समन्वयातून काम करण्यासाठी विभागवार व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. अतिरिक्त आयुक्त, वॉर्ड अधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार स्थानिक पातळीवर काम करीत आहेत. राज्य सरकारकडून येणाऱया सूचना आणि निर्देश पाळण्याबाबतही समन्वय साधून काम केले जात आहे. शिवाय पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा, रुग्णसंख्या-स्थितीचा अहवाल वरिष्ठ पातळीवरील अधिकारी राज्य सरकारला देत आहेत.

टास्क फोर्सच्या नियुक्तीमुळे मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांच्या पातळीवर मुंबईतील नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. यातील डॉक्टर हे राज्यातील कोरोनावर उपचार करणाऱया डॉक्टरांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. या कोविड 19 च्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय ओक हे आरोग्य तज्ञ आहेत. केईएमचे माजी डीन असलेल्या डॉ. ओक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभर काम सुरू आहे. या विशेष समितीच्या शिफारसीनुसार, मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून व करणाची व्याप्ती रोखण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे.

मुंबईत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही
मुंबईच्या विविध भागात पालिकेने आतापर्यंत 97 फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून साडेतीन हजारांहून अधिक जणांची तपासणी केली. त्यातील 913 संशयित रुग्णांपैकी केवळ 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या आकडेवारीवरून कोरोनाचा मुंबईत संसर्ग वाढत असला तरी आतापर्यंत मुंबईत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही, असे पालिकेने आज स्पष्ट केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह पाच व्यक्तीदेखील ‘ट्रव्हल हिस्टरी’ असणारे वा ट्रव्हल हिस्टरी असणाऱयांच्या निकटच्या संपर्कात असणारे आहेत, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी वॉर्डबॉय, नर्स यांची भरती सुरू आहे. अर्ज दादरच्या एफ नॉर्थ कार्यालयात स्वीकारले जात आहेत.

पाच रुग्णालयांमध्ये डायलीसिसची स्वतंत्र व्यवस्था
मुंबईत 5 रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था तात्काळ सुरू करण्यात आली आहे. यात कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय, सैफी रुग्णालय आणि नानावटी रुग्णालयाचा समावेश आहे. जे कोरोना बाधित रुग्ण वरील 5 रुग्णालयांव्यतिरिक्त ’करोना’साठीच्या इतर रुग्णालयात दाखल आहेत, त्यांनादेखील डायलिसिसची आवश्यकता असल्यास केवळ डायलिसिस करण्यापुरते वरील 5 रुग्णांलयांमध्ये पाठविता येईल.

वाढत्या गरजेसाठी रुग्णवाहिका भाडय़ाने घेऊन सुविधा
कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय सेवा वेगाने देण्यासाठी पालिका आता भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका घेणार आहे. सध्या मुंबई महापालिकेकडे असलेल्या रुग्णवाहिका सेवेवर ताण पडत आहे . यासाठी भाडेतत्त्वावर या रुग्णवाहिका चालक व सहायकसह घेण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका कोविड नियंत्रण केंद्रांपासून रुग्णालयांपर्यंत आपली सेवा देणार आहेत. पालिका प्रभागांमध्येही या रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत.

हजारो नर्स, डॉक्टरांना कोरोनाचे विशेष प्रशिक्षण
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तीन हजारांहून जास्त इंटर्न डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी व परिचारिका यांना कोरोना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. शिवाय 1 हजार 709 डॉक्टर्स, नर्सेस यांचे प्रशिक्षण महापालिकेच्या केईएम, नायर, टिळक व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये /रुग्णालयांमध्ये देण्यात आले.

‘बेस्ट’मध्ये गर्दी झाल्यास चालक व वाहक प्रवाशांना खाली उतरवणार
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना एसटी व बेस्ट बसमार्फत सेवा दिली जात आहे. यासाठी बसमध्ये चढण्यास व बसण्यास नियमवाली तयार केली आहे. तरी बेस्ट बसमध्ये गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे आता सामाजिक अंतर ठेवण्याबाबत वारंवार सांगूनही प्रवासी ऐकत नाहीत. त्या प्रवाशांना खाली उतरवण्याचा अधिकार चालक आणि वाहकांना दिला आहे. अनिवार्य परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेण्याकरिता जवळच्या आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

मुंबईतील कचऱयाची विल्हेवाट जैविक पद्धतीने
रोगराई टाळण्यासाठी मुंबईतील कचऱयाची विल्हेवाट जैविक पद्धतीने लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली असून विविध ठिकाणचा कचरा उचलल्यानंतर संबंधित जागा निर्जंतुकही करण्यात येत आहे. यामध्ये बाधित क्षेत्रातील कचऱयाची दैनंदिन विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक बाधित क्षेत्रातील कचरा स्वतंत्र गोळा करून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. तो वेगळ्यापध्दतीने वाहून नेत देवनार डम्पिंग ग्राऊंडवर खोलवर खड्डा खणत त्याची विल्हेवाट लावण्यात येते. यावेळी दोन्ही वेळा जंतूनाशकाची फवारणी करून तो परिसर पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.