
जगभरात कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. या व्हायरसमुळे जगभरात 8500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या एका शहरातून जगभरात पसरलेला हा व्हायरस हिंदुस्थानमध्येही घुसला आहे. देशातील रुग्णांची संख्या 160 पार गेली असून गुरुवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मृतांचा एकदा चार वर पोहोचला आहे. त्यामुळे भीतीदायक वातावरण आहे. याच दरम्यान, कोरोनाबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सार्क देशांशी चर्चा केली. सार्क देशांच्या प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधल्यानंतर मोदी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी हिंदुस्थानकडून 72 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी सार्क देशांना आपापल्या परीने निधी देण्याचे आवाहन केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक ट्विट करण्यात आले. पंतप्रधान मोदी गुरुवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतील, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या आहेत, याबाबत मोदी माहिती देण्याची शक्यता आहे. असे असतानाही पुढे कोरोनाशी लढा देण्यासाठी काय करायला हवे? याबाबत मोदी घोषणा करू शकतात किंवा आणखी एखादी मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात चौथा मृत्यू
दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पंजाब मधून एक दुःखद बातमी आली. पंजाबमध्ये एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकदा 4 वर पोहोचला आहे. याआधी कर्नाटकातील कलबुर्गी, दिल्ली, महाराष्ट्र मधील मुंबई येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

























































