कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरतंय ‘हे’ लक्षण, हजारो लोकांचा वाचला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून हिंदुस्थानमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. दिल्ली, अहमदाबाद येथे नाईट कर्फ्युही लावावा लागला आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूने आतापर्यंत अनेकदा रूपही बदलले असून प्रत्येक वेळी वेगवेगळी लक्षणेही दिसली आहेत. मात्र यातील एका लक्षणामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा जीव वाचला आहे. डॉक्टरांनी देखील हे मान्य केलंय.

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी तोंडाची चव जाते आणि वास घेण्याची क्षमता देखील नष्ट होते. यामुळे पदार्थांची चव आणि त्याच गंध समजत नाही. तसेच छातीत दुखू लागते. कोरोनाची लागण झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ही लक्षणे जाणवू लागतात. मात्र ही लक्षणेच अनेकांसाठी वरदान ठरली आहेत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

नोएडा येथील ‘यथार्थ हॉस्पिटल’चे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अरुण लखनपाल हे याबाबत बोलताना म्हणाले की, कोरोना रुग्णाच्या तोंडाची चव गेली आणि गंध ओळखण्याची क्षमता कमी झाल्यास हे वरदानच आहे. यामुळे तात्काळ एखादा व्यक्ती कोरोना संक्रमित झाला आहे याचा पत्ता लागू शकतो.

हजारो लोकांचा वाचला जीव

डॉ. अरुण लखनपाल पुढे म्हणतात, कोरोना संक्रमितापैकी जवळपास 40 टक्के लोकांना ही लक्षणे दिसल्याचे आढळले आहे. वैद्यकीय दृष्ट्या पाहिल्यास हा एक चांगला संकेत आहे. कारण यामुळे अनेक रुग्णांना वेळेआधी उपचार मिळाले आणि ते बरे।होऊन घरीही परतले.

लवकर बरेही झाले

गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात कोरोना पथकाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. सुशीला कटारिया यांनी सांगितले की, ज्या रुग्णांना चव कानी गंध ओळखण्यास अडचण आली त्यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरजही भासली नाही. असे रुग्ण लवकर बरेही झाले. त्यामुळे असा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.