कोरोनाविरोधात रशियाने चंग बांधला, दोन आठवडय़ांच्या आत पहिल्या बॅचला देणार लस

रशियाने कोरोनाला हरवण्याचा चांगलाच चंग बांधला आहे. ’स्पुटनिक-व्ही’ ही लस तयार करण्यात बाजी मारल्यानंतर पुढील दोन आठवडय़ांच्या आत देशातीोल पहिल्या बॅचला या लसीचा डोस देण्याचा निर्धार केला आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराशको यांनी बुधवारी ही माहिती दिली. देशातील गरज पूर्ण झाल्यानंतरच लसीच्या निर्यातीचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने जगात सर्वप्रथम ’स्पुटनिक-व्ही’ या कोरोना लसीची नोंदणी केली. संरक्षण मंत्रालय आणि गेमालेया रिसर्च इंस्टिटय़ूटने संयुक्तरित्या ही लस तयार केली आहे. लसीबाबत जगभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असतानाही रशियाने पुढील दोन आठवडय़ांत पहिल्या बॅचला लसीचा डोस देण्याच्या हेतूने पावले उचलली आहेत. मुराशको यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना हा निर्धार बोलून दाखवला. लसीकरण ऐच्छिक असेल. ज्या डॉक्टरांजवळ कोरोनाशी झुंज देण्यासाठी प्रतिकारशक्ती आहे, अशा डॉक्टरांचे प्रमाण 20 टक्के आहे. जर त्या डॉक्टरांना लस घ्यायची गरज वाटत नसेल, तर त्याबाबत निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार असेल, असेही मुराशको यांनी स्पष्ट केले.

स्थानिक बाजारातील मागणीला प्राधान्य
स्पुटनिक-व्ही लसीमध्ये निश्चितच निर्यात क्षमता आहे. रशियाची गरज पूर्ण झाल्यानंतरच लसीची इतर देशांमध्ये निर्यात केली जाऊ शकते. परंतु स्थानिक बाजारपेठेतील मागणीची पूर्तता करण्याला सरकारचे प्रथम प्राधान्य असेल, असे रशियाचे आरोग्य मंत्री मुराशको यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या