
खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. या आवाहनाला खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून कंपन्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्याचे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना ‘घरूनच काम करण्याचे’ निर्देश देण्याची तयारी दर्शविली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीवेळी अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवा, आस्थापना, कार्यालये बंद करण्याबाबत शिफारस यावेळी या कंपन्यांना केल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. ज्यांचा रोजदांरीवर उदरनिर्वाह आहे, त्यांच्यासाठी काही विशेष सोय करण्याबाबतही याबैठकीत चर्चा झाली. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्क निधीतून (सीएसआर) कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मास्क, सॅनेटाझर्स, पीपीई कीट, व्हेंटीलेटर्स, शासनासाठी उपलब्ध करून देण्याची यावेळी मान्य केले. रुग्णांच्या आयसोलेशनसाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याबाबत या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तयारी दर्शविली. जी औषधे अत्यावश्यक आहेत, ती देखील औषध कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याचे, आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीला बैठकीस लूपीनचे यश महाडीक, सोनी पिक्चर्सचे मनू वाधवा, एचएसबीसी बँकेचे विक्रम टंडन, सिप्लाचे राजीक मेस्त्री, एल ऍण्ड टीचे डा. के. जे. कामत, अक्सेंचर्सचे आदित्य प्रियदर्शन, एसएचआरएमच्या अंचल खन्ना, ग्लॅक्सो-स्मिथक्लाईनच्या मिनाक्षी प्रियम, डाएच्च बँकेच्या माधवी लल्ल, आदित्य बिर्ला ग्रुपच्या प्रिती चोप्रा, जान्सन ऍण्ड जान्सनचे सार्थक रानडे आणि राकेश साहनी, आयसीआयसीआय बँकेचे सौरभ सिंह, सिटी बँकेचे बी. सेंथिल नाथन, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सीमा नायर, ले-नेस्टचे डा. मुकेश गुप्ता आदी उपस्थित होते.


























































