
कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून या नागरिकांचे मनोबल वाढवता यावे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने ’प्रोजेक्ट मुंबई’ व ’प्रफुल्लता’ या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणाऱया संस्थांच्या सहकार्याने ‘संवाद’ हा अभिनव उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.
संवाद उपक्रमासाठी 1800 102 4040 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून माध्यमातून आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील नागरिक आणि आदिवासींचे समुपदेशन केले जाणार आहे.
असा आहे ’संवाद’ उपक्रम
नागरिकाला ’संवाद’च्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्यांना भेडसावणाऱया समस्या, चिंता यांचे निरसन मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून करून घेता येणार आहे.विविध जिह्यातील मानसोपचार तज्ञ समुपदेशक विना मोबदला या सेवेद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. हे मानसोपचार तज्ञ नागरिकांची स्थानिक बोली जाणणारे, असल्याची माहिती आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.
























































