दहा वर्षांत कोरोना सर्दी-तापासारखा सामान्य आजार बनेल; अमेरिकेतील संशोधकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानसह संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार उडविला आहे. मात्र येत्या दहा वर्षांत कोरोनाचा हा संसर्ग सर्दी-तापासारखा सामान्य आजार होईल, असा अंदाज अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केला आहे. कोरोना संसर्गाचा शरीरावर होणाऱया परिणामांचा गणितीय दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनातून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील गणित आणि जैवविज्ञानाचे प्राध्यापक अॅडलर यांनी हा अंदाज वर्तविला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात कोरोनाचा विषाणू मानवी शरीरावर कशा पद्धतीने परिणाम करतो, याचा अभ्यास यावेळी करण्यात आला आहे. या अभ्यासात येत्या दहा वर्षांत कोविडच्या आजाराची तीव्रता कमी होईल. कारण तोपर्यंत आपल्या सर्वांमध्ये त्याला प्रतिकार करण्याची क्षमता तयार होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. यावेळी काही गणितीय सूत्रे देखील अॅडलर यांनी मांडली आहेत.

  • कोरोनाच्या आजारात होणारे बदल हे विषाणूच्या स्वरुपामुळे होत नसून आपल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे होत असल्याचे यावेळी दिसून आले आहे.
  • या महामारीच्या सुरुवातीपर्यंत कोणालाही या विषाणूबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती यासाठी तयार नव्हती. येत्या काळात ही रोगप्रतिकार शक्ती तयार होईल, असे सांगण्यात आले आहे.
  • लहान मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे पहिल्यांदाच या विषाणूचा सामना करणाऱया लहान मुलांचा प्रश्न तसाच राहील, असे देखील यावेळी नमूद करण्यात आले आहे.