पालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवणारा कंत्राटदार ‘घुसमटला’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच ऑक्सिजनची मागणी वाढली असताना पालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवणाऱया कंत्राटदाराने 1200 ची निविदा असताना आयत्यावेळी केवळ 300 चा पुरवठा केला असून शिल्लक 900 चा पुरवठा करण्यासाठी वाढीव किंमत मागितली आहे. परिणामी पालिकेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरोधात आज स्थायी समितीत चांगलाच संताप व्यक्त झाला. अशा मुजोर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सक्षम ठेवल्यामुळे दुर्घटना घडलेली नाही. याच पार्श्वभूमीवर पालिकेने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढली होती. यासाठी पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने प्रतिसाद देत प्रत्येक मशीनसाठी 89 हजार 569 रुपये दराने 1200 मशीन्सचा पुरवठा करणे अपेक्षित होते. यामध्ये तीन वर्षांचा हमी कालावधी आणि दोन वर्षांच्या देखभालीसह मशीन्सचा पुरवठा करावयाचा होता. यानुसार पुरवठादाराने केवळ 300 मशीन्सचा पुरवठा केला आहे. तर उर्वरित मशीन्सचा पुरवठा वाढीव दराने करण्यास तयार असल्याचे कंत्राटदाराने स्पष्ट केले आहे. मात्र कंत्राटदार कोविडसारख्या महामारीच्या काळात ऐनवेळी अशी अडवणूक करीत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी, त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश यशवंत जाधव यांनी दिले.

निविदा प्रक्रियेची चौकशी करा!

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठय़ासाठी दुसऱया क्रमांकाच्या कंत्राटदाराने कमी दराने सर्व मशीन्स पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्याला काही कागदपत्रांच्या कारणासाठी जाणीवपूर्वक कामापासून दूर ठेवल्याचा आरोप स्थायी समितीत करण्यात आला. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देशही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. तसेच पुरवठा केलेल्या मशीन्सच्या कार्योत्तर मंजुरीसाठी आलेला प्रस्ताव मंजुरीविना राखून ठेवण्यात आला.