
कोरोनाच्या संकटकाळात आम्ही कुठल्याही राजकीय विचाराने काम करीत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे देणे लागतो या भावनेने आम्ही तिन्ही पक्ष काम करीत आहोत. अशा वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजकारण न करता कोरोनाच्या कामात लक्ष द्यावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे.
नाशिकमधील कोरोना उपाययोजनांचा आढावा शरद पवार यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत ते काम करतात, त्याचे सकारात्मक परिणाम मुंबईत दिसून आले आहेत. नाशिकला येण्याची त्यांचीही इच्छा होती. शुक्रवारच्या आढावा बैठकीचा अहवाल उपस्थित मंत्री त्यांना देतील, त्यावर मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय घेतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
संकट वाढेल असे काम नको
बकरी ईद बाबत बोलताना ते म्हणाले की, कोणाची मागणी काही असो, कोरोनाचे संकट वाढेल असे काम व्हायला नको. यापूर्वी ईद, शब्ब-ए-बारातच्या वेळीही अल्पसंख्यांक समाजाने चांगला समजूतदारपणा दाखवला, हे मालेगावचेही उदाहरण आहे. यावेळीही त्यांनी हा समजूतदारपणा दाखवावा अशी अपेक्षा आहे.



























































