इचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन

262

शहरात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तरीही दक्षता म्हणून आणखी तीन दिवस कडकडीत बंद ठेवून रविवारी दुपारी तीन तास भाजीपाला, फळे, रेशनसह किराणा दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, प्रकाश निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नंदकुमार मोरे, पालिका मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्यधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, आयजीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवीकुमार शेट्ये व पुरवठा अधिकारी अमित डोंगरे उपस्थित होते.

प्रांताधिकारी डॉ. खरात माहिती देताना म्हणाले, शहरातील 22 ठिकाणी भाजीपाला विक्री रविवारी दुपारी 12 ते 3 या काळात परवानगी देण्याचा निर्णय झाला. याच वेळेत रेशन धान्य दुकानात एप्रिल महिन्याचे धान्य वितरित केले जाईल. विक्रेत्यांनी व नागरिकांनी मास्क वापरावेत. नागरिकांना कोणतेही वाहने वापरता येणार नाहीत. लहान मोठ्या दुकानदारांना घरपोच किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तू मागणीप्रमाणे पुरवता येतील. सध्या दूध वितरण सुरू आहे. परप्रांतीय मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय विविध संस्था व प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. बाहेरून आलेल्याची काळजी घेण्यात येत आहे. जनतेचे हाल होणार नाहीत, याकडेही प्रशासनाचे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले.

आपली प्रतिक्रिया द्या