बॉलीवूडचे 11 चित्रपट लटकले, प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा फटका फिल्म इंडस्ट्रीला बसणार आहे. सध्या 11 सिनेमे तयार असून ते मोठय़ा पडद्यावर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. देशभरातील प्रमुख शहरांत लाकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू झाल्याने सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामुळे मागील वर्षीची नुकसानभरपाई तर दूरच, यावर्षीची कमाईदेखील होणार नाही, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान काही सिनेमे मोठय़ा पडद्यावर आले. मात्र त्यांना फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. ‘रुही’ या एका सिनेमाचा अपवाद सोडला तर एकही सिनेमा कमाई करू शकला नाही.

सहा महिन्यांत तीन हजार कोटींचे नुकसान

व्यापार विश्लेषक गिरीश वानखेडे यांच्या मते, 2021 मध्ये 50 हून अधिक सिनेमे प्रदर्शित होतील अशी आशा होती. त्यातून पाच हजार कोटींची कमाई होण्याची अपेक्षा होती. मात्र मागील तीन महिन्यांत जे काही सिनेमे प्रदर्शित झाले, ते जवळपास सर्वच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. येत्या काही महिन्यांत कोरोनाची लाट ओसरली आणि सिनेमांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, तरी अर्धे वर्ष हातातून गेलेले असेल. त्यामुळे बालीवूडचे अंदाजे तीन हजार कोटी नुकसान होईल.

मराठी सिनेमांनाही फटका

केवळ बॉलीवूडच नाही तर मराठी चित्रपटांनादेखील फटका बसला आहे. या महिन्यात प्रदर्शित होणारे स्कप्निल जोशीचा ‘बळी’, प्रथमेश परबचा ‘डार्लिग’, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ आणि जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

आमचा सिनेमा पूर्ण तयार आहे. 9 एप्रिल रोजी आम्ही ‘चेहरे’चे प्रदर्शन करणार होतो. मात्र कोरोनाचे वाढते रुग्ण आणि नवीन मार्गदर्शक सूचना बघून ‘चेहरे’चे प्रदर्शन पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलले आहे. मी आशा करतो की, लवकर हे संकट दूर व्हावं आणि परिस्थिती पूर्ववत व्हावी. आम्ही प्रेक्षकांची चित्रपटगृहांमध्ये वाट बघू. – रुमी जाफरी, दिग्दर्शक

आपली प्रतिक्रिया द्या