तळीरामांचा कार्यालयातील दारुसाठ्यावर डल्ला; एक लाख तेरा हजाराचा जप्तीचा दारुसाठा लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन तळीरामांचा जिवावर उठला आहे. वाटेल त्या मार्गाने दारु मिळविण्यासाठी तळीरामांची केविलवाणी धडपड सूरु आहे. राजूर्यातील तळीरामांनी तर कहरच केला. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून चक्क एक लाख तेरा हजाराची दारु लंपास केली.दारु कुणी चोरली हा मोठा प्रश्न पोलीसांना पडला आहे. चोरट्यांचा शोधात पोलीस लागले आहेत.

राजूरा येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे शिपाई जगदीश मस्के यांनी कार्यालयाचे मुख्यद्वाराला कुलूप लावून गेले होते त्यानंतर दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने आज सकाळी कार्यालयात गेले असता कार्यालयाच्या मुख्यद्वाराचे व लोखंडी दाराचे कुलूप तूटलेल्या स्थितीत आढळून आले. दारू तस्करीत जप्त केलेल्या कार्यालयातील दारूचा बाटला गायब होत्या. दारूबंदीचा कार्यवाहीत पकडण्यात आलेल्या देशी, विदेशी दारूचा 1 लाख 13 हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा माल कार्यालयात ठेवून होता. कार्यालयातील हा दारुसाठा चोरट्यांनी लंपास केला. तळीरामांची सहनशिलता दिवसेगणिक ढासळत चालली असून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयही आता सुरक्षित नसल्याचे या घटनेतून दिसते.