
>> कृष्णप्रकाश, (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)
लॉकडाऊननंतर आताच्या अनलॉक काळातही अनेक बंधनांमुळे पोलिसांवरील ताण कायमच आहे. आम्हाला स्वतःच्या आधी जनतेची काळजी प्राधान्याने घ्यावी लागते आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन या काळात पोलिसांसमोर अनेक आव्हानं आहेत. कारण सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णालयांत लोकांना बेड मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. असे प्रसंग घडलेलेही आहेत. आरोपीला जेव्हा पकडायला जातात किंवा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायला जातात तेव्हा पोलिसांना रोगाची लागण होण्याची शक्यता असते. आतापर्यंत 400च्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 15 हजारांच्या आसपास पोलीस कर्मचारी संक्रमित झाले होते. 160 अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये दगावले आहेत. यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्येही भीतीचे वातावरण आहे, मात्र हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आमचं काम आम्ही करतच राहणार आहोत.
पोलीस दिवसभर पीपीई किटमध्ये राहू शकत नाहीत. आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना पीपीई किट घालू शकतात. इतर वेळी नाही. त्यामुळे त्यांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. कंटेन्मेंट झोन नियंत्रणात ठेवणे अत्यंत अवघड आहे. लोकांचीही शिस्त पाळण्याची मनःस्थिती राहिलेली नाही. तेव्हा बंदोबस्त ठेवणे अवघड जाते. यावेळी लोकांचे सहकार्य अपेक्षित असते.
पोलिसांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी?
- पोलीस खात्याने संपूर्ण नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मास्क, सॅनिटायझर, जीवनसत्त्व सी, डी 3, आर्सेनिक अल्बम पोलीस आणि कुटुंबीयांनाही पुरवले आहे.
- आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या सूचनांचे पालनही आपण करत आहोत.
- योग मार्गदर्शक अलकाजी योगेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, योगासने, नाडीशोधन, कपालभाती या सर्व कृती पोलिसांकडून करवून घेतल्या जात आहेत.
- प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पोलिसांकरिता बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
- महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना याअंतर्गत पोलिसांना सरकारकडून कॅशलेस उपचार मिळते.
- इंजेक्शन, गोळ्या, वन टू वन कॉल पद्धतीने अधिकारी पोलीस कर्मचाऱयांच्या संपर्कातही राहतात.
- ज्या सुविधा पोलिसांसाठी आहेत त्या त्यांच्या कुटुंबीयांनाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
घरी गेल्यावर…
- जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत कुटुंबीयांत मिसळू नये.
- घरातही सॅनिटायझरचा वापर करावा.
- पोलिसांवर अनेक निर्बंध आहेत. पण कुटुंबीयांकरिता स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबीयही सुरक्षित राहतील.
- काही पोलिसांची बाहेर राहण्याचीही व्यवस्था केली आहे.
- त्यांच्या कोविड सेंटरचीही व्यवस्था केली आहे.


























































