
लॉकडाऊन शिथील करून खासगी कार्यालये 10 टक्के सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी लोकल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. यामध्ये दुचाकीवरून बिनदिक्कतपणे डबल सिट प्रवास सुरू असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ उडाली.

गेल्या अडीच महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमधून काहीशी सुटका झाली असली तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झालेली वाहनांची गर्दी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली. यातच ‘बेस्ट’ सुरू झाली असली तरी रिक्षा-टॅक्सीसाठी प्रवासी-कर्मचार्यांना ताटकळत रहावे लागल्याचे चित्र होते. यामुळे प्रत्येक जण मिळेल त्या वाहनाने इच्छीत स्थळ गाठण्याचा प्रयत्न करीत होता. यात खासगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या.

































































