
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये दोन दिवशीय आढावा बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाब, चंदीगड आणि ईशान्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ‘कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यू अस्वस्थ करणाऱ्या आहेत. भविष्यात जेव्हा कधी हिंदुस्थानच्या कोरोनाविरूद्ध लढ्याचा अभ्यास केला जाईल. त्यावेळी आपण या काळात कसे एकत्र मिळून काम केले, हे लक्षात ठेवले जाईल.’
पंतप्रधान पुढे म्हणाले आहेत की, ‘जगातील मोठे तज्ञ, आरोग्य तज्ञ, लॉकडाऊन आणि हिंदुस्थानी लोकांनी दाखवलेली शिस्त, यावर आज चर्चा करत आहेत. हिंदुस्थानात आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. कोरोना बाधित रुग्णांना वाचवण्यात हिंदुस्थान जगातील काही आघाडीच्या देशांमध्ये गणला जातोय.’ ते म्हणाले की, आपल्याला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की, आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जितके रोखू शकू तितकीच आपली अर्थव्यवस्था खुलेल. आपली कार्यालये उघडतील, बाजारपेठा उघडतील, वाहतुकीचे साधन खुले होतील आणि रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील’, असं ते म्हणाले आहेत.
पंतप्रधानांची आज या राज्यातील मुख्यमंत्र्यांसह होणार बैठक
आज पंप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल, लडाख, झारखंड, छत्तीसगड, गोवा, केरळ, पुडुचेरी, आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल, मिझोरम, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, अंदमान-निकोबार, दादर नगर हवेली, दमण दीव, लक्षद्वीपचे मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांशी बैठक होणार आहे.

























































