
कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील महर्षीनगर पोलीस चौकीच्या शेजारीच फुटपाथवर एका तरुणाचा मृतदेह एक तासापासून पडून असल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह उचलण्यास कोणीच पुढे येत नसल्याने रुग्णवाहिका येऊन गेल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत महर्षीनगर पोलीस चौकी असून त्याठिकाणी पदपाथवर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन रुग्णवाहिकेला याची माहिती देण्यात आली. रुग्णवाहिका त्याठिकाणी आली. परंतु, त्या कर्मचाऱ्यांनी हा तरुण कोठून आला आहे. दिल्लीला गेला होता का अशी विचारणा केली. त्यावेळी या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे ते देखील तेथून परत गेले, अशी माहिती स्थानिक नागरिकाकडून मिळाली आहे. दरम्यान कोरोना झाला असण्याच्या शक्यतेने मृतदेहाला कोणी हात लावत नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या सर्व गोंधळात एक तासापासून मृतदेह पदपथावर पडून राहिला असल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
































































