घरी कमाई! ‘वर्क फ्रॉम होम’करून 92 हजार कोटींचा जीएसटी!!

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे आणि वर्क फ्रॉम होमला सुरुवात करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. कोणत्या विभागामध्ये वर्क फ्रॉम होम शक्य आहे आणि महसुलावर किती परिणाम होईल, याची शक्यता तपासण्यासाठी मागील लॉकडाऊनच्या काळातील कामाचा सरकारने आढावा घेतला तेव्हा जीएसटी विभागाच्या कर्मचाऱयांनी ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात तब्बल 92 हजार कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा करून दाखवल्याचे पुढे आले आहे.

मंत्रालयात काम करणाऱया सरकारी कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आणि किती विभागांना वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने काम करता येईल, याचे तत्काळ नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

वास्तविक मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग सर्वोच्च केंद्रस्थानावर असताना लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱयांनी घरातून यशस्वीपणे काम करून दाखवले आहे. त्यात जीएसटी विभागाचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल.

राज्य सरकारी सेवेच्या काही विभागांतील कर्मचारी घरातून काम करू शकतात. काही कामे ऑनलाइन पद्धतीने घरातून होऊ शकतात. जीएसटी विभागाने मागील वर्षी कोरोना काळात चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षी डिसेंबरपर्यंत जीएसटी विभागाने राज्य जीएसटीचा 92 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा केला. जीएसटी विभागातील 90 टक्के कर्मचारी घरातून काम करू शकतात. इतर काही विभागांतील कर्मचारीही वर्क फ्रॉम होम करू शकतात हे मागील लॉकडाऊनच्या काळात सरकारी कर्माचाऱयांनी दाखवून दिले आहे. – विनोद देसाई, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य

राजपत्रित अधिकारी महासंघ

एप्रिल व मे महिन्यात जवळजवळ सर्व व्यवसाय बंद होते. त्यामुळे महसूल जवळजवळ ठप्प झाला होता, मात्र जून, जुलै व ऑगस्ट महिन्यानंतर जीएसटी विभागात महसुलाचा आलेख वाढत गेला.

आपली प्रतिक्रिया द्या