
जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू असून दररोज संक्रमित रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. हिंदुस्थानातही कोरोना रुग्णांची संख्या 17 हजारावर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 550 पर्यंत पोहचली आहे. ही आकडेवारी जास्त असली तरी कोरोनाविरोधातील लढाईत हिंदुस्थानचा विजय होण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेली वाढ आणि कोरोनाचे संक्रमण फैलावाचा मंदावलेला वेग हे हिंदुस्थानच्या विजयाचे संकेत आहेत.
आतापर्यंत देशभरात 2500 पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हिंदुस्थानमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 8 टक्के होते. ते आता 14 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी पाठवण्यात येत आहे, हे हिंदुस्थानचे मोठे यश आहे. देशातील 736 जिल्ह्यांपैकी 411 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच संक्रमण झालेले नाही. सुमारे अर्धा देश कोरोनाच्या संकटापासून लांब आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणापासून अर्ध्या देशाला वाचवण्यात यश आले आहे. गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. या राज्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळले होते. त्यातील 6 कोरोनामुक्त झाले होते. तर रविवारी सातव्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले आणि गावा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. गोव्यानंतर मणीपूरनेही सोमवारी राज्य कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले. राज्यात कोणताही नवा रुग्ण आढळला नसून दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उत्तर प्रदेशचे पीलीभीत, महाराजगंज आणि हाथरस या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच प्रयागराजही कोरोनामुक्त झाला आहे.
जगातील इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानने कोरोनाचा धैर्याने मुकाबला केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेही हिंदुस्थानने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. हिंदुस्थानने उचललेल्या या पावलांमुळेच देशामध्ये संक्रमण फैलावण्याचे प्रमाण घटले आहे. लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी तीन दिवसात रुग्णांची संख्या दुपटीने वाढत होती. आता रुग्णांची संख्या दुप्पट होण्यास सहा दिवस लागत आहे. काही राज्यांमध्ये हा कालावधी आणखी वाढल्याने कोरोनाच्या संक्रमणाचा फैलाव मंदावला आहे. त्याचप्रमाणे कोरोना चाचणीचा वेग आणि क्षमता वाढली असून त्याचे अहवालही लवकर मिळत आहेत. त्यामुळे रुग्णांवर योग्य वेळेत उपचार सुरू करणे शक्य होत आहे. कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल देशात शक्य त्या ठिकाणी वापरण्यात येत आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास कोरोनाविरोधातील युद्धात हिंदुस्थानचा विजय होण्याचे संकेत मिळत आहेत.

























































