चौदा दिवसांत एकही रूग्ण आढळला नाही; मुंबईत 368 प्रतिबंधित क्षेत्र रद्द!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी गेल्या चौदा दिवसांत एकही रुग्ण आढळला नसल्याने 368 प्रतिबंधित क्षेत्रे रद्द करण्यात आली आहेत. एकूण 1577 कंटेनमेंट झोनमधील 685 ब्ल्यू झोनमध्ये स्थिती नियंत्रणात असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. मात्र 533 कंटेनमेंट ‘रेड’ झोनमध्ये रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रसार रोखण्यासाठी संबंधित विभाग पालिका प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे. यामध्ये आतापर्यंत 1577 विभाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र यातील 368 ठिकाणी गेल्या 14 दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळला नसल्याने संबंधित विभाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत एकूण 1209 कंटेनमेंट झोन शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. रहिवाशांच्या दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या वस्तू घरपोच पुरवण्याची व्यवस्था, परिसर वेळोवेळी निर्जंतुक करणे आणि रेड झोनमध्ये पोलीस-पालिकेच्या माध्यमातून विशेष नजर ठेवण्यात येत आहे.

वरळी परिसरात आठ प्रतिबंधित क्षेत्र कमी

पालिकेच्या जी-साऊथ विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे स्थिती नियंत्रणात येत आहे. यामध्ये एकूण 102 पैकी आठ प्रतिबंधित क्षेत्र रद्द करण्यात आली आहेत. तर शिल्लक राहिलेल्या 94 प्रतिबंधित क्षेत्रापैकी तब्ब्ल 44 ठिकाणी स्थिती पूर्ण नियंत्रणात असून 19 दाटीवाटीची वस्ती असलेल्या ठिकाणीही योग्यरीत्या उपाययोजना सुरू आहेत. तर 39 ‘रेड’ प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस आणि पालिकेच्या वतीने ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.

या पाच विभागात सर्वाधिक कंटेनमेंट झोन

  • एल वॉर्ड (कुर्ला) – 205 प्रतिबंधित क्षेत्र
  • के पश्चिम (अंधेरी प. विले पार्ले प.) – 165 प्रतिबंधित क्षेत्र
  • ई विभाग (भायखळा) – 146 प्रतिबंधित क्षेत्र
  • एच पूर्व (खार, सांताक्रुझ, वांद्रे)- 103 प्रतिबंधित क्षेत्र
  • जी साऊथ (वरळी, लोअर परळ) – 102 प्रतिबंधित क्षेत्र