‘कोरोना’च्या नानाची टांग; मुंबईत धुळवडीचा जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसला कोरोना आणि कसले काय…कोरोनाचे सावट आहे म्हणून धुळवड साजरी करायची नाही असे मुंबईकरांच्या मनातही आले नाही. मुंबईत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात धुळवडीचा सण मंगळवारी साजरा झाला. ‘कोरोनाच्या नानाची टांग’ म्हणत मुंबईकरांनी कोरोनासुराला होळीत भस्मसात करून एकमेकांवर रंगांची उधळण केली. धुळवड साजरी करताना सावधगिरी बाळगतानाच मुंबईकरांनी कोणतीही दुष्ट शक्ती आमचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही हे दाखवून दिले.

चीनमध्ये उद्भवलेला कोरोना विषाणू जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. हिंदुस्थानातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सावधगिरी म्हणून गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. त्याचा आदर राखत मुंबईकरांनी गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन थांबवले आहे. पण हजारो वर्षांपासून सुरू असलेले सण आणि परंपरा या जपल्याच पाहिजेत या भावनेने आज धुळवड मात्र नेहमीप्रमाणेच साजरी केली.

मुंबईतील सोसायटय़ांमध्ये सोमवारी होळीचा सण साजरा झाला. वरळीच्या बीडीडी चाळीत ‘कोरोनासुरा’ची होळी केली गेली. पेटत्या होळीसमोर कोरोनाच्या नावाने बोंब घातली गेली. आज मंगळवारी पारंपरिक पद्धतीने धुळवडही झाली. रंगपंचमीनिमित्त तरुणाई विविधरंगी रंगांमध्ये रंगली होती. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुण-तरुणी बेधुंद झाल्या होत्या. कोरोनाच्या भीतीने कोंबडय़ा खाणे बंद असले तरी कोंबडीची अंडी एकमेकांच्या डोक्यावर फोडताना तरुण दिसत होते. पिचकाऱया तर होत्याच, पण काही ठिकाणी टँकर मागवून पाण्याच्या फवाऱयांवर ताल धरला गेला. रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगांची उधळण करण्याची खबरदारीही घेतली गेली.

कोरोनाचे संशयित रुग्ण आढळत असले तरी मुंबईकर तितकेच सावधही आहेत. साधा सर्दी-खोकला झाला तरी नागरिक डॉक्टरांचा सल्ला निश्चितच घेऊ लागले आहेत. महानगरपालिकेचे दवाखाने आणि खासगी डॉक्टरांच्या क्लिनिक्समध्ये सर्दी- खोकल्याचे रुग्ण येत आहेत, पण बहुतांशांना वातावरणातील बदलामुळे तो त्रास होत असल्याचे निदान होत आहे. तरीही कुठलाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

वाहनचालकांवरील कारवाईत मालाड आघाडीवर

मुंबईत मंगळवारी शेकडो वाहनचालकांवर बेकायदा गाडी चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. मालाडमध्ये (289) सर्वाधिक कारवाई करण्यात आली. तर त्यापाठोपाठ वरळी (219), वाकोला (170), कांदिवली (170), दादर (160), चेंबूर (140) आदी ठिकाणांचा समावेश आहे. तर सर्वात कमी कारवाई पायधुणी (7), वडाळा (12) येथे झाली. शिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून 1322 चालकांवर कारवाई करण्यात आली.

चार हजार पाचशे वाहनचालकांवर कारवाई

धुळवड साजरी करताना नियमांचे पालन करा अशा स्पष्ट सूचना असतानाही अतिउत्साही चालकांनी रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला. दारू ढोसून गाडी चालविण्याबरोबर विनाहेल्मेट आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱया जवळपास साडेचार हजार चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. दारूच्या नशेत तर्रर्र होऊन गाडी चालविणारे 486 जण सापडले, ट्रिपल सीट जाणाऱया 341 जणांवर कारवाई करण्यात आली, तर विनाहेल्मेट गाडी चालविणाऱया 3025 दुचाकीस्वारांना पोलिसांनी पकडले. त्याशिवाय सुसाट गाडी चालविणाऱया 1471 चालकांवर कारवाई करण्यात आली.