
एसटी कामगारांवरील अन्यायाविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने आवाज उठवल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्यभरातील एसटी कामगारांच्या वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी आणखी 192 कोटी रुपये द्या, अशी मागणी एसटी महामंडळाने सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कामगारांना वेतन फरक देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
एसटी कामगारांना 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची रक्कम देण्यास चालू महिन्यात पुन्हा टाळाटाळ केली आहे. त्यामुळे सरकारविरोधात असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिले. त्याची दखल घेत एसटी महामंडळ प्रशासनाने राज्य सरकारला नव्याने पत्र लिहीत 192 कोटी रुपयांच्या अतिरिक्त रकमेची मागणी केली. कामगारांच्या मागील वेतनापोटी प्राप्त झालेली 75 कोटी रुपयांची रक्कम आणि वेतनवाढ फरक हप्त्याची 116.60 कोटी रुपये अशा प्रकारे एपूण 192.32 कोटी रुपये रक्कम देण्याची मागणी एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. वेतनवाढ फरकाची रक्कम अनेक वर्षे प्रलंबित होती. ती रक्कम मिळण्यासाठी पृती समितीच्या माध्यमातून संघर्ष करण्यात आला. त्यानंतर सरकारने फरकाचा हप्ता देण्याबाबत आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र गंडवागंडवीच सुरू असल्याने एसटी कामगारांमध्ये असंतोष आहे.
251पैकी 3 आगारांतील कामगारांना फरक रक्कम अदा
वेतनवाढ फरक हप्ता देण्याच्या प्रक्रियेत एसटी महामंडळाचा अजब कारभार उघडकीस आला आहे. एसटीच्या एपूण 251 आगारांपैकी केवळ रत्नागिरी विभागातील गुहागर, दापोली व राजापूर या तीन आगारांतील कामगारांना वेतनवाढ फरक हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली. ही रक्कम चुपून अदा करण्यात आल्याचे समजते.
आर्थिक देणी बंद केल्याने आत्मदहनाचा इशारा
एसटी महामंडळाने कामगारांच्या आर्थिक देणीच्या थकीत रकमेचा हप्ता आठवडाभरात न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आत्मदहन करेन, असा इशारा देत महामंडळाच्या नाशिक विभागातील सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

























































