कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस राहणार बंद

सामना ऑनलाईन । पुणे

देशातल्या नावाजलेल्या बँकांपैकी एक अशा कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली आहे.

बँकेतून काढण्यात आलेले सर्व पैसे हे एकाच दिवशी नाही तर दोन तीन दिवसात हिंदुस्थानसह २९ देशांतील विविध एटीएम सेंटरवरून काढण्यात आले आहेत. १२ हजारहून अधिक ट्रान्झॅक्शन विदेशात तर २८०० ट्रान्झॅक्शन हिंदुस्थानात झाले आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे. या मागे मोठी क्रिमनल यंत्रणा आहे असाल्याचं मिलिंद काळे सांगितलं.

हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर नाही!

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला झाल्याच्या बातम्या खोट्या असून बँकेतील पेमेंट स्वीचवर मालवेअर अॅटॅक झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानसह २९ देशांतून एटीएम सेंटरवरून डेबिट कार्ड, व्हिसा कार्डचा वापर करून पैसे काढण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सायबर पोलीस, आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा, आरबीआयला माहिती देण्यात आली आहे. आरबीआयचे अधिकारी सतत संपर्कात असून बँकेला सर्व ती मदत करत आहेत, असंही काळे यांनी सांगितलं.

खातेदार आणि ठेविदारांचे पैसे सुरक्षित!

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरल्याने खातेदार आणि ठेविदारांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र त्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सर्वाचे पैसे सुरक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं. अपहार हा बँकेच्या पैशांचा झाला आहे. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व तपास यंत्रणा बँकेला सहकार्य करताहेत. त्यामुळे चिंतेचं कारण नाही, असंही ते म्हणाले.

खबरदारी म्हणून एटीएम बंद ठेवण्यात आली असली तरी बँकेच्या शाखांमधून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. खातेदारांना त्यांच्या व्यवहारात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच आरटीजीएसवरून व्यवहार सुरू आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.

summary: cosmos bank atm will be closed for next 2 days