कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ला प्रकरणी युएई पोलिसांकडून एकाला अटक

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी रुपये लुटणाऱ्या मुख्य तीन आरोपीपैकी एकाला संयुक्त अरब अमिराती (युएई) पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांकडून केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून ‘युएई’ पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.

सुमेर शेख (वय 28, रा. मुंबई, सध्या दुबई) असे ‘युएई’ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सायबर चोरट्यांनी 11 व 13 ऑगस्ट 2017 मध्ये कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर हल्ला चढवून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये काढून घेतले होते. याप्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 12 ते 13 आरोपींना अटक केले आहे.

सायबर चोरट्यांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली. त्यानंतर माहितीचा वापर करुन बनावट एटीएम कार्ड बनवून सव्र्हर हॅक करून फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी देश-परदेशात टोळ्या बनविल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून पैसे काढून घेतले. तर हाँगकाँगच्या हेनसेंग बँकेमध्ये आरोपींनी 11 ते 12 कोटी रुपये पाठविले होते.

त्यापैकी सहा कोटी रुपये परत मिळविण्यात पुणे पोलिसांना यश आले. दरम्यान, कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला करण्यामध्ये सुमेर शेखची महत्वाची भुमिका आहे. त्यानेच हल्ल्याचे नियोजन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली असण्याची शक्यता आहे. इंटरपोलच्या माध्यमातून शेखबाबत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती.

त्यामुळे 28 देशांचे पोलीसही सतर्क झाले होते. सायबर हल्ल्यातील प्रमुख तीन आरोपींपैकी एक सुमेर शेख आहे. त्यास ‘युएई’ पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा ताबा पुणे पोलिसांना मिळावा, यासाठी हिंदुस्थानी तपास संस्थांच्या माध्यमातून आम्ही ‘युएई’ पोलिसांशी संपर्क साधला असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या