गुजरातमध्ये आश्रमाच्या नावाखाली सुरु होता बनावट नोटांचा कारखाना, 2 कोटींहून अधिक रक्कम जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्रमाच्या नावाखाली खोट्या नोटा छापण्याचे एक रॅकेट निदर्शनास आले आहे. श्री सत्य योग फाउंडेशनच्या आश्रमात बनावट नोटा छापण्याचे एक रॅकेट सुरू होते. बाहेरून धर्म आणि योगाचे केंद्र वाटणारा हा आश्रम, प्रत्यक्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या एका नेटवर्कचे केंद्र होते.

अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरतमधून चालणाऱ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक केली आहे. सुरतच्या धोरापर्डी गावातील ‘श्री सत्य योग फाऊंडेशन’च्या आश्रमात बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी अमराईवाडी परिसरातून अंदाजे २ कोटी रुपये किमतीच्या ४०,००० हून अधिक बनावट नोटा जप्त केल्या.

गुजरातमध्ये बनावट नोटांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान, अहमदाबाद गुन्हे शाखेने एक मोठे यश मिळवले आहे. सुरतमधून चालणाऱ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत, पोलिसांनी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटांसह सहा जणांना अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे संपूर्ण ऑपरेशन एका आध्यात्मिक आश्रमाशी संबंधित होते. तपासात असे उघड झाले की, बनावट नोटा छापण्याचे हे रॅकेट सुरतच्या कामरेज तालुक्यातील धोरापर्डी गावातील ‘श्री सत्य योग फाऊंडेशन’च्या आश्रमात कार्यरत होते.

गुन्हे शाखेला अशी गुप्त माहिती मिळाली की, सुरतहून अहमदाबादला बनावट चलनाचा मोठा साठा आणला जात आहे. याच्या आधारे, अमराईवाडी परिसरात पाळत ठेवण्यात आली, जिथे संशयास्पद हालचालींनंतर एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४०,००० हून अधिक बनावट ₹५०० च्या नोटा जप्त करण्यात आल्या, ज्यांचे एकूण मूल्य अंदाजे ₹२ कोटी आहे.

चौकशीत असे उघड झाले की, या बनावट नोटा सुरतच्या वराछा परिसरात छापण्यात आल्या होत्या आणि त्या चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती. खऱ्या नोटांसाठी ५०० रुपये द्या आणि बनावट नोटांसाठी १,५०० रुपये घ्या. याचा अर्थ असा की, ६६ लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. पहिल्याच व्यवहारादरम्यान आरोपींना पोलिसांनी पकडले.

क्राईम ब्रांचच्या पथकाने सुरतमधील आश्रम आणि इतर ठिकाणी छापे टाकून छपाई यंत्रे, संगणक, विशेष कागद, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या नेटवर्कमध्ये आश्रमाच्या वाहनांचाही वापर केला जात होता. पंचनाम्यादरम्यान, ४०,००० हून अधिक नोटांचे अनुक्रमांक नोंदवण्यासाठी पोलिसांना तासनतास काम करावे लागले.