अंगाला घाण वास येत असल्याची सहप्रवाशाची तक्रार, जोडप्याला बाळासह विमानातून उतरवले

अमेरिकेच्या डेट्रॉईटमधील मायामी विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी एका जोडप्याला बाळासह विमानातून खाली उतरवले. योस्सी अॅडलर आणि जेनी असं या दोघांची नावे असून या दोघांच्या अंगाला घाण वास येत असल्याची विमानातील इतर प्रवाशांनी तक्रार केली होती. या तक्रारीमुळेच या दोघांना खाली उतरवण्यात आले. योस्सी अॅडलर हा व्यवसाय सल्लागार असून त्याने म्हटलंय की त्यांच्या कोणाच्याही अंगाला घाण वास येत नव्हता. आम्ही ज्यू असल्याने त्यांना विमानातून उतरवण्यात आले असा आरोप त्याने केला आहे. हे जोडपं बुधवारी आपल्या बाळासह मायामीवरून डेट्रॉईटला जात होतं. विमानात बसल्यानंतर काही प्रवाशांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली होती.

एका स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना योस्सी अॅडलर यांनी म्हटले की अचानक त्यांनी आम्हाला विमानातून बाहेर काढले यानंतर त्यांनी दरवाजे बंद करून गेतले आणि म्हटले की आम्हाला तक्रार आली आहे की तुमच्या अंगाला घाण वास येत आहे. सॉरी, आम्ही आता तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. सदर प्रकाराने गोंधळलेल्या योस्सीच्या बायकोने विमानतळावरील व्यक्तींना गाठून त्यांच्या अंगाला घाण वास येत आहे का अशी विचारणा केली होती. विमानातून या जोडप्याला उतरवलं खरं मात्र त्यांचं सामान विमानातच होतं. सामान तुम्हाला मिळेल असं सांगितलं होतं, मात्र ते मिळालंच नाही. अमेरिकन एअरलाईन्सने याबाबत बोलताना म्हटले की विमानातील अन्य प्रवाशांनी या जोडप्याच्या अंगाला घाण वास येत असल्याची तक्रार केली होती, ज्यामुळे त्यांना विमानातून उतरवण्यात आलं. या दोघांसाठी हॉटेल बुक करण्यात आले आणि त्यांना जेवणासाठी व्हाऊचरही देण्यात आली आहेत. दुसऱ्या दिवशीसाठी या दोघांना पुन्हा तिकीटही बुक करून दिले आहे.