गुप्तधनासाठी जोडप्याने घातली पूजा, 60 पुजाऱ्यांना खोट्या नोटांची दक्षिणा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुप्तधनासाठी पूजा घालून त्या पुजेला बोलवलेल्या पुजाऱ्यांना एका जोडप्याने गंडवल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी या जोडप्याला अटक करण्यात आली असून 2013पासून हा प्रकार सुरू असल्याची माहितीही मिळत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचं नाव गुलासी राम पाठक आणि गीता पाठक असं आहे. या जोडप्याचा सीतापूर जिल्ह्यातील मथुरा येथे गीता निवास नावाचा एक आश्रम आहे. त्या आश्रमात गुप्तधन असून ते सापडण्यासाठी पूजा घालण्याची गळ बहराईच येथील दिलीप कुमार पाठक नावाच्या पुजाऱ्याला या दांपत्याने घातली. त्याने 60 पुजाऱ्यांसह सलग 14 दिवस या आश्रमात पूजा केली.

गुरुवारी सलग 14 दिवसांची ती पूजा संपली आणि या पुजाऱ्यांना दांपत्याने एक सुती कापडाची बंद बॅग दिली. त्या बॅगेत त्यांची दक्षिणा आहे असं सांगून घरी गेल्यावर बॅग उघडा असं या दांपत्याने त्यांना सांगितलं. या पुजाऱ्यांनी घरी गेल्यावर ती बॅग उघडली. तेव्हा त्यांन धक्का बसला. कारण त्यात नोटांची बंडलं होती, मात्र त्यातील पहिल्या काही नोटा खऱ्या होत्या. उर्वरित सर्व नोटा खोट्या होत्या.

ते पाहून धक्का बसलेल्या पाठक या पुजाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या जोडप्याविषयी आणखी तपास केला असता या जोडप्याने 2013 पासूनच अशाच प्रकारे अनेकांना गंडे घातल्याचं आढळलं. पुजाऱ्याच्या तक्रारीवरून या जोडप्याला अटक करण्यात आली आहे.