गाडीत झोपायचे, पेट्रोल पंपावर आंघोळ! जोडप्याची भटकंती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच निघतो’ हे साध्य करून दाखवलंय केरळमधील एका जोडप्यानं. देशभरात भटपंती करण्याचं आपलं स्वप्न सध्या ते पूर्ण करतायत. गेल्या सहा महिन्यांपासून हे जोडपं रोड ट्रीपवर निघालं असून आतापर्यंत त्यांनी दहा हजार किमीचा प्रवास केला आहे. आपल्याला मनसोक्त फिरता यावं, ट्रीपमध्ये कामाचा अडथळा येऊ नये म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडून सध्या ते फ्री लान्सिंग नोकरी करतायत.

थ्रिसुरमध्ये राहणाऱया हरिकृष्ण जे आणि लक्ष्मी कृष्णा या जोडप्याची ही कहाणी आहे. सेल्स आणि ग्राफिक्स डिझायनरच्या नोकरीला रामराम ठोकला असून सध्या ते देशभरात भटकंती करत आहेत. 28 ऑक्टोबर 2020 ला त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. अजूनही त्यांचा प्रवास सुरूच आहे. हरिकृष्णन म्हणाला, आम्हा दोघांनाही भटपंतीची खूप आवड आहे. 2019 साली आम्ही थायलंडला ट्रीपला गेलो होतो. तिथे आम्हाला इतका आनंद झाला होता की आम्ही ‘टिनपिन स्टोरीज’ नावाचे यूटय़ूब चॅनेल सुरू केले.

प्रवासात आपल्यासोबत त्यांनी प्रत्येकाचे दहा जोडी कपडे, स्वयंपाकाची भांडी आणि व्हिडीओ एडिटिंगसाठी लॅपटॉप सोबत ठेवला आहे.सुरुवातीला त्यांनी 60 दिवस प्रवास करायचं ठरवलं होतं. त्यासाठी अडीच लाखांचा खर्च येईल असा त्यांचा अंदाज होता. मात्र आतापर्यंत 130 दिवसांचा प्रवास झाला असून खर्च खूपच कमी आल्याचे हरिकृष्णन म्हणाला. उडुपीपासून गोकर्णपर्यंत त्यांनी प्रवास केला आहे. प्रवासातील अनुभव त्यांनी आपल्या यूटय़ूब चॅनेलवर शेयर केले आहेत.

असा आहे दिनक्रम

आपल्या प्रवासात त्यांनी हृषिकेश, हिमाचलमधील खेडी, कर्नाटकातील हंपी, चिकमंगळूर यासारख्या जवळच्या ठिकाणांना भेटी दिल्या. हे जोडपं रात्री कारमध्येच मुक्काम करतं. सकाळी एखाद्या पेट्रोल पंपावर आंघोळ करून ते पुढच्या प्रवासाला निघतात. दोन्ही वेळेस स्वतः जेवण बनवतात. आंतरराष्ट्रीय ट्रीपला जाण्याचे आपले स्वप्न कोरोनामुळे अधुरे राहिल्याचे त्यांनी सांगितले.