प्रेम प्रकरणातून मावस भाऊ-बहिणीची आत्महत्या, मोहोळ तालुक्यातील घटना

suicide

प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना झाल्यास विरोध होईल म्हणून मावस भाऊ-बहिणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मोहोळ तालुक्यातील नरखेड गावात घडली. गुरुवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. प्रतीक्षा समीर शिंदे (16) आणि प्रशांत रविंद्र (बापू) शिंदे (19) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.

प्रतीक्षा समीर शिंदे आणि प्रशांत रविंद्र (बापू) शिंदे हे दोघे सख्खे मावस भाऊ बहिण आहेत. प्रशांत शिंदे याला आई वडील नाहीत. त्याचे शिक्षण पुणे येथे झाले होते. पारधी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे समाजसेवक गिरीष प्रभुणे यांच्याकडे तो शिक्षण घेत होता. साधारण पाच वर्षांपूर्वी तो आपल्या आजीकडे नरखेड तालुका मोहोळ येथे आला होता. त्याची सख्खी मावशी नरखेड मध्येच राहण्यास असल्यामुळे त्यांच्या घरी त्याची सतत येणे झाले होते.

दरम्यानच्या काळात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सख्या मावशीची मुलगी प्रतिक्षा हिच्याबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघांच्या नात्याची कुणकुण घरच्यांना लागल्याने त्यांनी दोघांचीही समजूत काढली. मात्र बुधवारी मध्यरात्री दोघेही घरातून बाहेर पडले आणि शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी दुपारी १२ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रीतसर पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या