
सामना प्रतिनिधी । भोकर
विवाहानंतर प्रियकराशी पळून गेल्याचा राग मनात ठेवून बहीण व प्रियकराची हत्या केल्या प्रकरणी भावाला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच या गुन्ह्यातील दुसर्या आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
भोकर तालुक्यातील थेरबन येथील पुजा बाबुराव दासरे हिचे भावाचा मित्र गोविंद विठ्ठल कर्हाळे याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाची चाहूल पुजाचा भाऊ दिगंबर बाबुराव दासरे याला लागताच दोघांना समज देऊन बहिणीचे जातीतील मुलाशी लग्न लावून दिले. लग्नानंतर प्रेम विसरू न शकलेल्या पुजाने प्रियकर गोविंद सोबत संपर्क करून पलायन केले. तेलंगणातील मुधोळ मंडळातील खरबाडा येथे वास्तव्यास राहून जीवन व्यथित करताना बहिणीने इतर समाजातील मित्रासोबत पळून गेल्याने आपल्या खानदानाची अब्रू गेली, समाजात बदनामी झाली याचा राग उराशी बाळगून मित्रासह बहिणीचा काटा काढण्याचा कट दिगंबर दासरे याने रचून यात मोहन नागोराव दासरे या चुलत भावाला सामील करून घेतले. 23 जुलै 2017 रोजी खरबाडा येथे बहिणीच्या घरी गेले. व तुमच्या दोघांचे लग्न बासर येथे लावून देतो असे घरातील मंडळीला सांगून दुचाकीवरून निघाले. तेलंगणा सीमेवरील दिवशी निवघा परिसरातील एका नाल्याजवळ गाडी थांबवून दिगंबर दासरे यांनी मनातील राग व्यक्त करत विळ्याने मित्र गोविंद याचा गळा कापला. प्रियकरावर हल्ला होत असल्याचे पाहून पुजा बचावासाठी धावली असता दिगंबर याने बहिणीवर सुध्दा सपासप वार करून निर्घृण हत्या केली.
भोकर पोलीस स्टेशनमध्ये येवून दिगंबर याने खुनाची माहिती देत कबुली दिली. न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणात एकुण 8 साक्षीदाराची साक्ष घेण्यात येवून सर्व पुराव्याची पडताळणी करून जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी कलम 302,34 भादवी प्रमाणे दिगंबर बाबुराव दासरे याला दुहेरी खुन खटला प्रकरणी फाशीची शिक्षा व 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला तर सह अरोपी मोहन नागोराव दासरे यास दुहेरी खुन खटल्या प्रकरणी जन्मठेप व 11 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर येथील आजचा फाशीचा निकाल हा प्रथमच असून हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिल चव्हाण, पोलीस जमादार नामदेव जाधव यांनी केला तर सरकारी वकील म्हणून रमेश राजुरकर, आरोपीचे वकील म्हणून मोहन जाधव यांनी बाजू मांडली.
समाजातील खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी नियोजीत कट करुन हत्येसारखा गुन्हा करण्याचे प्रमाण समाजात वाढत चालल्याने याला आळा बसण्यासाठी सुप्रीम कोर्टाने फाशीच्या सजेचे प्रावधान केले असल्याची माहिती निकालाच्या वेळी न्यायाधीश मुजीब शेख यांनी दिली. या प्रकरणी आरोपीस काय शिक्षा होणार हे ऐकण्यासाठी न्यायालयीन परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली होती.

























































